VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
भाडभीडीत वनहक्कासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; राज्य शासनाकडे एकमुखी मागणी,
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांचा पुढाकार; वनदावा व शेतीपट्ट्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर कार्यशाळेत चर्चा,
गडचिरोली /घोट, २८ ऑक्टोबर २०२६ ::-चामोर्शी तालुक्यातील वनजमिनीवरील हक्क, वनदाव्यांची प्रलंबित प्रकरणे आणि शेतीपट्ट्यांच्या प्रश्नांवरून भाडभीडी (बि.) येथे शेतकरी व नागरिकांनी एकजूट दाखवत राज्य शासनाकडे वनहक्क दाव्यांसाठी लागू असलेली तीन पिढ्यांची अट शिथिल करण्याची जोरदार मागणी केली. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून शासनाचे लक्ष वेधले. वनहक्क मिळविण्याच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी दूर करून पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी भूमिका यावेळी उपस्थितांनी मांडली.
राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (असो.), नवी दिल्ली, जिल्हा गडचिरोली आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती, भाडभीडी यांच्या संयुक्त विद्यमाने वनदावा करणाऱ्या शेतकरी व नागरिकांसाठी माहिती आणि मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत चामोर्शी तालुक्यासह परिसरातील विविध गावांमधील शेतकरी, महिला, युवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
तीन पिढ्यांच्या अटीमुळे वनहक्काचा प्रश्न ऐरणीवर :-
वनदावा सादर करताना येणाऱ्या अडचणी, आवश्यक कागदपत्रे, दाव्यांची पडताळणी आणि शासनदरबारी प्रलंबित असलेली प्रकरणे याबाबत कार्यशाळेत चर्चा करण्यात आली. वनहक्क दाव्यांसाठी असलेली तीन पिढ्यांची अट शिथिल करावी, अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी एकमुखाने केली. अनेक शेतकऱ्यांचे वनदावे आणि शेतीपट्ट्यांची प्रकरणे प्रलंबित असल्याने त्यांना न्याय मिळण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या मागणीसाठी शेतकरी व नागरिकांनी एकत्र येत रस्त्यावर उतरून राज्य शासनाचे लक्ष वेधले. वनजमिनीवर पारंपरिकरीत्या अवलंबून असलेल्या पात्र शेतकरी व कुटुंबांच्या हक्कांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
डॉ. प्रणय भाऊ खुणे यांच्यासह मान्यवरांचे मार्गदर्शन :-

कार्यशाळेत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे आणि कुरखेडा येथील महसूल कार्यालयातील वनहक्क विषयक मार्गदर्शक दीपक सुनतकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वनहक्क दाव्यांशी संबंधित प्रक्रिया, कागदपत्रांचे महत्त्व आणि प्रलंबित प्रश्नांच्या पाठपुराव्याबाबत त्यांनी माहिती दिली.
यावेळी वनविभागाचे आर.ओ. चिवाणे, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी जाधव, तलाठी येनगंटीवार, ग्रामसेवक प्रकाश कुंघाडकर, वनहक्क समितीचे भास्कर कोवासे, पोलीस पाटील किरणताई सुरपाम, माजी सरपंच एकनाथ भुरसे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कोवासे, मंचू पुंगाटी, वाडीघरे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.
२२ गावांतील शेतकऱ्यांचा सहभाग :-
या कार्यशाळेला जाणाळा, रेखेगाव, आमगाव, चक क्रमांक दोन, अनंतपूर, कुदरसी, जंगमपूर, बिलासपूर, हळदवाही, हळदवाही टोला, मंजेगाव, राजूर बुजुर्ग, राजूर खुर्द, लाभानतांडा, मक्केपल्ली, चापलवाडा, माडेमुधोली, रेगडी, पोतेपल्ली, माडेआमगाव, विकासपल्ली, घोट आणि पेटतळा परिसरातील शेतकरी व नागरिक सहभागी झाले. वनदावे आणि शेतीपट्ट्यांसंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला.
संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सहकार्य :-

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, उपाध्यक्ष नानू भाऊ उपाध्ये, किशोर कुंडू, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक विनोद किरमे, श्रीकांत वैरागडे, सचिन देशमुख, गुरुदेव सातपुते, संदीप गवारे, बंडूजी देशमुख, नीलकंठ बुरांडे, एकनाथ वासेकर, श्रीकृष्ण बुरांडे, विठ्ठल बुरांडे, किशोर गवारे, वासुदेव वैरागडे, सुभाष वैरागडे, मेघनाथ वैरागडे, जितेंद्र देशमुख आदींनी सहकार्य केले.
याशिवाय इंदिराबाई गवारे, शोभाबाई किरमे, सुशीला सोनटक्के, सुंदराबाई बुरांडे, वनिता वासेकर, कमलबाई वैरागडे, मायाबाई किरमे, सुनंदाबाई वैरागडे, चंद्रकलाबाई वासेकर, कांताबाई देशमुख, कीर्तीताई देशमुख यांच्यासह भाडभीडी येथील महिला, नागरिक, युवक व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वनहक्क दाव्यांच्या प्रश्नावर शेतकरी एकवटले असून, तीन पिढ्यांच्या अटीत शिथिलता आणून पात्र लाभार्थ्यांच्या प्रलंबित दाव्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य शासन काय निर्णय घेते, याकडे आता परिसरातील शेतकरी व नागरिकांचे लक्ष लागले आहे.
