Wednesday, October 28, 2026
HomeChamorshiMIDC विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! २,०९६ हेक्टर जमीन अधिग्रहण रद्द करण्याची मागणी...

MIDC विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! २,०९६ हेक्टर जमीन अधिग्रहण रद्द करण्याची मागणी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप; शेतकरी-महिलांचा उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ३ तास ठिय्या,

२९ ऑक्टोबरपासून येनापूर येथे आंदोलन; जयरामपूरच्या शेतकऱ्यांचा भूसंपादनाविरोधात आक्रमक पवित्रा,

चामोर्शी, 28 ऑक्टोबर 2026 ::- 2,096 हेक्टर जमिनीवरील प्रस्तावित MIDC प्रकल्प रद्द करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू! असा ठाम निर्धार करत जयरामपूर परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी भूसंपादनाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गुरुवार, २९ ऑक्टोबरपासून येनापूर येथे ठिय्या आंदोलन करण्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी, २८ ऑक्टोबर रोजी शेतकरी निवेदन देण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहोचले. मात्र, निवेदन स्वीकारण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी आणि महिलांनी कार्यालयासमोर तब्बल तीन तास ठिय्या मांडला. अखेर नायब तहसीलदार फुलझले यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर हा पेच सुटला.

निवेदनासाठी आलेल्या शेतकऱ्यांना तीन तास प्रतीक्षा :-

जयरामपूर परिसरातील बाधित शेतकरी आणि महिला आपल्या जमिनी वाचविण्याच्या मागणीसाठी प्रशासनाकडे दाद मागण्यासाठी आले होते. प्रस्तावित MIDC प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनाला विरोध दर्शवत त्यांनी २९ ऑक्टोबरच्या आंदोलनाची माहिती प्रशासनाला देण्याचे ठरविले होते.

मात्र, कार्यालयात निवेदन स्वीकारले जात नसल्याने शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर शेतकरी आणि महिलांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडत आपली भूमिका स्पष्ट केली. तब्बल तीन तास चाललेल्या या ठिय्यानंतर नायब तहसीलदार फुलझले यांनी निवेदन स्वीकारले. या घटनेमुळे भूसंपादनाच्या प्रश्नावरून शेतकरी आणि प्रशासनातील तणाव समोर आला आहे.

२,०९६ हेक्टर जमिनीवर प्रस्तावित MIDC; शेतकऱ्यांचा तीव्र विरोध :-

चामोर्शी तालुक्यातील येनापूर-जयरामपूर परिसरात प्रस्तावित औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रकल्पासाठी टप्पा क्रमांक २ मधील ४९२ हेक्टर आणि टप्पा क्रमांक ५ मधील १,६०४ हेक्टर, अशा एकूण २,०९६ हेक्टर क्षेत्रावरील भूसंपादनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

या प्रकल्पामुळे आपल्या शेतीवर आणि जमिनीवरील हक्कांवर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. मौजा मुधोली चक क्रमांक १ येथील शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी संमती दिलेली नसतानाही पुढील कार्यवाही केली जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे संबंधित अधिसूचना रद्द करून प्रस्तावित क्षेत्र भूसंपादनातून वगळण्याची मागणी त्यांनी केली आहे.

२९ ऑक्टोबरला येनापूर येथे ठिय्या आंदोलन :-

भूसंपादनाची प्रक्रिया थांबवावी, टप्पा क्रमांक २ व ५ मधील संपूर्ण २,०९६ हेक्टर क्षेत्राचा प्रस्ताव रद्द करावा आणि बाधित शेतकरी व ग्रामस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांवर लेखी निर्णय द्यावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

या मागण्यांसाठी गुरुवार, २९ ऑक्टोबरपासून संबंधित मंडळ अधिकारी, येनापूर यांच्या कार्यालयासमोर शांततामय व लोकशाही मार्गाने ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे.

प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष :-

जमीन हा शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार असल्याने भूसंपादनाचा प्रश्न संवेदनशील बनला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासनाने गांभीर्याने विचार करून स्पष्ट भूमिका मांडावी, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

निवेदन स्वीकारण्यासाठी तीन तास ठिय्या मांडण्याची वेळ आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता २९ ऑक्टोबरच्या येनापूर आंदोलनात किती शेतकरी सहभागी होतात आणि भूसंपादनाबाबत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे येनापूर-जयरामपूर परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular