VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
तसेच मा.खा.डॉ. नेते यांनी मृत्यू पावलेल्या इसमाच्या कुटुंबियांची सांत्वना भेट व जखमींना साहारा देण्यासाठी दवाखान्यात दाखल,
गडचिरोली, ०७ ऑगस्ट २०२५ ::- आरमोरी-गडचिरोली महामार्गावर आज पहाटे ५ वाजता काटली-साखरा गावाजवळ एक भीषण अपघात घडला. भरधाव ट्रकने दुचाकीस्वार युवकांना चिरडल्याने चार होतकरू तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून जनतेत तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

अपघातानंतर संतप्त नागरिकांनी आरमोरी टी-पॉईंटवर रास्ता रोको करत महामार्गावरील वाहतूक ठप्प केली. प्रशासनाने पोलीस बंदोबस्त वाढवत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा शोकसंदेश:-
राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी अपघाताबाबत तीव्र दुःख व्यक्त करत शोकसंदेश दिला आहे. “गडचिरोली जिल्ह्यातील या भीषण अपघातात ४ युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.सध्या जखमी युवकांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना नागपूर येथे हलवण्यासाठी व्यवस्था सुद्धा केली आहे. राज्य सरकारतर्फे सर्व उपचाराची जबाबदारी घेतली जाईल.मृतांच्या कुटुंबांना ४ लाखांची आर्थिक मदत देण्यात येईल,” अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिली.
मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांची दुःखद भावना: “घरचा आधार हरपला:-

भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी अपघातस्थळी भेट देत आपले दुःख व्यक्त केले. “ही घटना केवळ अपघात नव्हे, तर कुटुंबाचा आधार हरपल्यासारखी आहे. जे युवक आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मेहनत करत होते, त्यांचा असा अकाली अंत हा समाजाचीच हानी आहे.

मी या सर्व दिवंगत तरुणांना मन:पूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो व त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.जखमी युवकांना तातडीने आवश्यक उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत,” अशी भावना त्यांनी भेट देत व्यक्त केली.डॉ. नेते यांनी अपघातात मृत्यू पावलेल्या युवकांच्या घरी जाऊन कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी शासनाच्या मदतीसाठी स्वतः पुढाकार घेण्याची ग्वाही दिली.
जिल्हाभरात हळहळ – महामार्गावर उपाययोजनांची मागणी:-
ही दुर्घटना संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरवणारी ठरली असून अपघातात मृत्यूमुखी पडलेले युवक हे परिसरातील मेहनती, कर्तबगार आणि आशावादी तरुण होते. त्यांच्या निधनामुळे तरुणांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.स्थानिकांनी महामार्गावरील वाहतुकीस कठोर मर्यादा घालण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. नेते यांनी वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित केली आहे. यावेळी सोबत गडचिरोली विधानसभेचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
