VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
प्रस्ताव मागे न घेतल्यास उग्र आंदोलनाची घोषणा,
गडचिरोली, ११ नोव्हेंबर २०२५::- अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समिती, गडचिरोली येथील अधिकारी व दक्षता कोरम यांना किनवट-2 येथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव तत्काळ रद्द करावा, अशी ठाम मागणी आमदार रामदासजी मसराम यांनी केली असून निर्णय मागे न घेतल्यास गडचिरोलीत उग्र आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.यासंदर्भात आमदार मसराम यांनी आदिवासी विकास मंत्री मा. ना. अशोक ऊइके यांना निवेदन सादर केले.
गडचिरोली हा अतिदुर्गम, मागास व आदिवासी बहुल जिल्हा असल्याचे नमूद करून, येथे गोंड, माडिया, परधान तसेच इतर अनुसूचित जमातींचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी, बेरोजगार युवकांसाठी आणि नागरिकांसाठी गडचिरोलीतच कार्यरत असलेली जात तपासणी समिती ही अत्यावश्यक सेवा पुरविते, असे त्यांनी स्पष्ट केले.गेल्या काही वर्षांत सुमारे 2,950 प्रकरणे ऑनलाइन नकाराधीन झाली असून त्यांची प्रत्यक्ष शहानिशा आणि पुनर्विलोकन करणे आवश्यक आहे.
अशा पार्श्वभूमीवर फक्त एका वर्षातील ऑनलाइन प्रकरणांच्या संख्येचा हवाला देत समितीचे स्थलांतर करण्याचा निर्णय हा अन्यायकारक व अव्यवहार्य असल्याचे आमदार मसराम यांनी निवेदनात म्हटले आहे.समिती किनवटला स्थलांतरित झाल्यास अत्यंत दुर्गम भागातील विद्यार्थी, युवक आणि सर्वसामान्य आदिवासी बांधवांना मोठ्या अंतराचा प्रवास, वाढीव खर्च आणि वेळेचे भरीव नुकसान सहन करावे लागेल.
त्यामुळे जात प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिकच कठीण होऊन आदिवासी समाजाचे नुकसान होणार असल्याचा त्यांनी इशारा दिला.या सर्व परिस्थितीचा सखोल विचार करून गडचिरोली येथील अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समिती तसेच दक्षता कोरम यांचे स्थलांतर तात्काळ रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी आमदार मसराम यांची मागणी आहे. ही मागणी मान्य न झाल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
