VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
ग्रामस्थांची डॉ. अजय कंकडालवार यांच्याकडे धाव्ली रस्त्याच्या प्रतीक्षेत; ग्रामस्थांची डॉ. अजय कंकडालवार यांच्याकडे धाव,
कप्पेवंचा ते कोडसेपल्ली रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर; चिखल, पायवाट आणि आरोग्यसेवेच्या अडचणींनी ग्रामस्थ त्रस्त,
गडचिरोली /अहेरी, 19 सप्टेंबर 2026::- स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासीबहुल गावांना पक्क्या रस्त्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. कप्पेवंचा ते कोडसेपल्ली या मार्गावर आजपर्यंत रस्त्याचे बांधकाम झाले नसल्याची व्यथा ग्रामस्थांनी मांडली असून, या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजय कंकडालवार यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे.
डॉ. अजय कंकडालवार यांनी नुकतीच कप्पेवंचा या अतिदुर्गम गावाला भेट देऊन परिसरातील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. अनेक वर्षांपासून रस्त्याअभावी भेडसावणाऱ्या अडचणी ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर मांडल्या.
कप्पेवंचा पुढे कोडसेपल्लीसाठी रस्ताच नाही :-
कप्पेवंचा गावापर्यंत कसाबसा खडीकरणाचा रस्ता उपलब्ध आहे. मात्र, कप्पेवंचा ते कोडसेपल्ली या पुढील मार्गावर आजपर्यंत रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. स्वातंत्र्यापासून या मार्गावर रस्ता झालेला नसल्याने कोडसेपल्ली आणि परिसरातील नागरिकांना आजही जंगलातील पायवाटेने प्रवास करावा लागत आहे.
पावसाळ्यात या मार्गाची परिस्थिती अधिकच बिकट होते. रस्त्याअभावी नागरिकांना दैनंदिन कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, मूलभूत सुविधांपासूनही वंचित राहावे लागत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
गुडघाभर चिखल; रुग्णवाहिकाही गावापर्यंत पोहोचणे कठीण :-
कप्पेवंचा गावातील रस्त्यावर पावसामुळे गुडघाभर चिखल साचत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावात एखादी व्यक्ती आजारी पडल्यास रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकत नाही. अशा परिस्थितीत रुग्णाला झोळीवरून किंवा खांद्यावरून मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागते. त्यामुळे वेळेवर उपचार मिळविण्यात अडचणी निर्माण होतात.
शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चिखलातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. अनेकदा रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे शक्य होत नसल्याची समस्या ग्रामस्थांनी मांडली.
शेतमाल बाजारात नेण्यात अडचणी; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान :-
रस्त्याअभावी शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसत आहे. शेतात पिकवलेला माल बाजारपेठेत नेण्यासाठी योग्य मार्ग उपलब्ध नसल्याने शेतमालाच्या वाहतुकीत अडचणी येतात. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याची व्यथा यावेळी व्यक्त करण्यात आली.
ग्रामस्थांनी यापूर्वीही प्रशासनाकडे रस्त्याची मागणी केली होती. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू होण्याऐवजी केवळ आश्वासनेच मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. “कप्पेवंचा ते कोडसेपल्ली रस्ता आम्हाला जगण्यासाठी द्या,” अशी भावनिक साद ग्रामस्थांनी डॉ. कंकडालवार यांच्याकडे घातली.
रस्ता मंजुरीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार – डॉ. कंकडालवार :-
ग्रामस्थांची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर डॉ. अजय कंकडालवार यांनी रस्त्याच्या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली. कप्पेवंचा गावापर्यंत रस्ता असताना पुढे कोडसेपल्लीपर्यंत रस्ता नसणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
कप्पेवंचा ते कोडसेपल्ली या नवीन रस्त्याला तातडीने मंजुरी मिळणे आवश्यक असल्याचे सांगत, या प्रश्नासाठी आपण स्वतः शासन दरबारी, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषद स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.
“कप्पेवंचा ते कोडसेपल्ली रस्ता मंजूर करून घेण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असून, ग्रामस्थांच्या या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करणार आहे,” अशी ग्वाही डॉ. कंकडालवार यांनी दिली.
त्यांच्या आश्वासनामुळे कप्पेवंचा व कोडसेपल्ली येथील ग्रामस्थांमध्ये रस्त्याचा प्रश्न मार्गी लागण्याबाबत आशा निर्माण झाली आहे. यावेळी ग्रामस्थांनी डॉ. कंकडालवार यांचे आभार मानले.
या पाहणी दौऱ्यावेळी गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येने महिला व पुरुष ग्रामस्थ उपस्थित होते.
