VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचीही विविध गावांत माहिती,
गडचिरोली /चामोर्शी, 19 सप्टेंबर 2026::-महिला शेतकरी, शेतमजूर आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील विविध गावांमध्ये व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प तसेच महाराष्ट्र महिला सक्षमीकरण महिला शेतकरी अधिनियम २०२६ संदर्भात महिलांना सविस्तर माहिती देण्यात येत आहे.

या जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना शासनाकडून कोणते लाभ मिळू शकतात, त्यासाठी कोणत्या प्रकारे अर्ज करावा आणि महिला शेतकरी प्रमाणपत्राचे महत्त्व काय आहे, याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. शेती क्षेत्रात महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण असून, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.

यावेळी सहायक कृषी अधिकारी प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत विविध घटकांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन केले. या प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती घेऊन पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले.

तसेच महिला शेतकरी, शेतमजूर महिला आणि शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्या महिलांना शासनाकडून महिला शेतकरी असल्याबाबतचे प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे संबंधित महिलांनी महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी जास्तीत जास्त संख्येने अर्ज करावेत, असे आवाहन सहायक कृषी अधिकारी प्रदीप मुंडे यांनी केले.
महिलांना शेती क्षेत्रात सक्षम बनविणे, त्यांना शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देणे आणि विविध योजनांच्या लाभासाठी प्रोत्साहित करणे, हा या जनजागृती मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांमध्ये योजनांविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होत आहे.
