VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
तालनवमी सप्ताहानिमित्त सत्संग प्रवचनाचे आयोजन; भक्तांसाठी स्नेहभोजनाचीही व्यवस्था,
गडचिरोली, 19 सप्टेंबर 2026::- चामोर्शी तालुक्यातील रेगडी–हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत मौजा पलासपूर येथे अनुकूल ठाकूर सत्संग सेवा मंडळ, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने तालनवमी सप्ताहानिमित्त उद्या, रविवार, दिनांक २० सप्टेंबर २०२६ रोजी भव्य सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने गडचिरोली–चिमूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार अशोक भाऊ नेते, गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद भाऊ नरोटे आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
या सत्संग समारोहात राज्यासह परराज्यांतून येणारे आदरणीय सत्संगी व मान्यवर दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उपस्थित भक्तांना सत्संग प्रवचनातून मार्गदर्शन करणार आहेत. या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भक्तांना आध्यात्मिक विचारांचे श्रवण करण्याची संधी मिळणार आहे.
मान्यवरांचा जाहीर सत्कार :-
सत्संग समारोहाचे औचित्य साधून अनुकूल ठाकूर सत्संग सेवा मंडळ, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने माजी खासदार अशोक भाऊ नेते, आमदार डॉ. मिलिंद भाऊ नरोटे आणि प्रणय भाऊ खुणे यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सत्संगप्रेमी भक्तांची उपस्थिती अपेक्षित आहे.
भक्तांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था :-
सत्संग प्रवचन व सत्कार सोहळ्यानंतर पलासपूर येथील सत्संग समारोहस्थळी समस्त भक्तजन, मान्यवर आणि उपस्थित पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या धार्मिक सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी भक्तिमय वातावरणात एकत्र येण्याची संधी उपलब्ध केली आहे .
या भव्य सत्संग समारोहाला जिल्ह्यातील अनुकूल ठाकूर भक्त, पदाधिकारी, कार्यकर्ते, आमंत्रित व निमंत्रित पाहुणे तसेच सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर पलाश भाऊ घरामी, पंकज सेठ घरामी आणि अनुकूल ठाकूर सत्संग सेवा मंडळ, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
