VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली,१० फेब्रुवारी २०२६::- गुरुवळा: पोलीस आणि वनविभाग (फॉरेस्ट) भरतीची जिद्दीने तयारी करणाऱ्या गुरुवळा येथील युवकांसाठी रेखाताई डोळस धावून आल्या आहेत. अभ्यासासाठी हक्काची रूम उपलब्ध करून देण्यासोबतच, युवकांच्या शारीरिक तयारीसाठी ‘ओपन जिम’ तात्काळ मंजूर करून देण्याची महत्त्वाची हमी त्यांनी दिली आहे.
अभ्यासासाठी हक्काची रूम उपलब्ध :-
गावातील अनेक तरुण सध्या आगामी शासकीय भरतीसाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. मात्र, शांत वातावरणात अभ्यास करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध नसल्याने त्यांची अडचण होत होती. ही बाब समजताच रेखाताई डोळस यांनी स्वतः युवकांना फोन करून संवाद साधला आणि त्यांच्या अभ्यासासाठी तात्काळ एका रूमची व्यवस्था वाचनालय म्हणून करून दिली.
शारीरिक तयारीसाठी ‘ओपन जिम’ मंजूर करणार :-
केवळ लेखी परीक्षाच नव्हे, तर मैदानी चाचणीतही गावचे तरुण अव्वल राहावेत यासाठी रेखाताईंनी मोठे पाऊल उचलले आहे. गावात युवकांसाठी ‘ओपन जिम’ (Open Gym) तात्काळ मंजूर करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यामुळे व्यायामासाठी आवश्यक साहित्याची कमतरता आता भासणार नाही, अशी आशा युवकांना लागली आहे.
