Friday, May 22, 2026
HomeGadchiroliभाजप - काॅंग्रेस शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहेत : डाव्या लोकशाही पक्षांची टीका...

भाजप – काॅंग्रेस शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहेत : डाव्या लोकशाही पक्षांची टीका …

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

शेतकरी बांधवांनो काळ कठीण आलेला आहे, सावध होवून, एकत्र येण्याचे आवाहन ,

गडचिरोली ,०३ एफ्रिल २०२६::-जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी स्टील प्लांटसाठी भूसंपादन होत आहे. विशेषतः भेंडाळा, जैरामपूर, अडपल्ली, येवली – शिवणी परिसरात शेतकरी तीव्र आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. मात्र पण जिल्ह्यात मुळात लोह प्रक्रिया कारखाने होण्यापासून आणि त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनींचे भूसंपादन होण्यापासून थांबवणे कठीण झाले आहे. याला सत्ताधारी भाजप एवढाच काॅंग्रेससुध्दा जबाबदार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सापनाथ आणि नागनाथांच्या बनावटबाजीला बळी पडून आपल्या शेतजमिनी घालवू नये असे आवाहन डाव्या लोकशाही आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

स्थानिक सर्कीट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत डाव्या आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की, रोजगाराच्या नावाखाली भाजप – काॅग्रेसच्या लोकांनी हा जिल्हा कधीचाच भांडवलदारांच्या हवाली केलेला आहे. शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे की या जिल्ह्यात जंगल – पहाडात लोह खाणी सुरू होत आहेत, म्हणून लोह प्रक्रिया कारखाने सुरू होत आहेत. कारखाने होणार तर आपल्या शेतजमिनी बळजबरीने बळकावल्या जाणारच!

सध्या सुरजागड येथे एकच लोहखाण सुरू आहे. वेलमागड – बुर्गी, झेंडेपार – आगरी – मसेली या ११ लोहखाणींची मंजुरी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तर दमकोंडवाही, पुसेर – मुतनूर सह ४० पेक्षा अधिक ठिकाणी लोह खाणींची चाचपणी सुरू आहे. या खाणींमधून निघणाऱ्या लोह दगडावर प्रक्रिया करण्यासाठी हेडरी, कोनसरी, वडलापेठा येथे स्टील प्लांट उभारण्याचे काम सुरू आहे. मुधोली – जैरामपूर, भेंडाळा येथे भूसंपादनाची कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. जिंदाल, वरद फेरो अलाॅय सह जवळपास ४० स्टील प्लांट मंजूरीच्या प्रक्रियेत आहेत. तर ५० पेक्षा जास्त स्टील कंपन्या स्टील प्लांट उभारण्यांनी प्राथमिक चाचपणी सुरू केली आहे. अहेरी विभागात काही प्रमुख सिमेंट कंपन्यांनीही खाण आणि कारखान्यांसाठी तयारी सुरू केलेली आहे. 

एकुणच गडचिरोली जिल्ह्यात लहान मोठे शंभरेक स्टील आणि सिमेंट प्लांट येणाऱ्या ५ – ६ वर्षांत उभारले जाणार आहेत. यासाठी किमान १ लाख २० एकर शेतकऱ्यांची खासगी शेतजमीन भूसंपादीत होणे क्रमप्राप्त आहे. तर होवू घातलेला विमानतळ, रेल्वे, समृद्धी महामार्ग, मायनिंग काॅरीडोर मार्ग अशा विविध बाबींसाठी किमान २५ – ३० हजार एकर शेतजमीन भूसंपादीत होणे निश्चित आहे. तर विविध खाणींपोटी दिड लाख लाख एकरहून अधिक जंगल क्षेत्र उध्वस्त केला जाणार आहे. प्रक्रिया कारखान्यांसाठी जिल्ह्यातील एकूण शेतजमिनी पैकी ६५ ते ७० % शेतजमिनी येणाऱ्या दिवसांत भूसंपादीत होणे टाळता येण्यासारखे नाही. शेतकऱ्यांच्या शेतजमीनी वाचवायच्या असतील तर शेतकऱ्यांनी आधी भांडवलदारांचा पाठिराखा भाजप आणि संधीसाधू काॅंग्रेसचा त्याग केला पाहिजे, कारण याच लोकांनी या जिल्ह्यात रोजगाराच्या नावाखाली खाणी मंजूर केल्या, ठोस विरोधाची भूमिका न घेता खाण कंपन्यांचे समर्थन केले. ज्यामुळे आता शेतकऱ्यांच्या शेत जमिनीमध्ये बळजबरीने भूसंपादन करुन स्टील प्लांट लागणार आहेत. 

आमचे डावे पक्ष आणि स्थानिक ग्रामसभा जेव्हा जेव्हा गडचिरोली जिल्ह्यात लोह खाणी नकोत म्हणून लढत आले, तेव्हा तेव्हा भाजप उघडपणे तर काॅग्रेस आडमार्गाने खाणींच्या समर्थनात राहिले आहेत. आता जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या जमिनींच्या भूसंपादनाचा प्रश्न उभा राहतो तेव्हा तेव्हा हेच भाजप – काॅंग्रेसचे लोकं शेतकऱ्यांचे तारणहार आहोत हे दाखवण्यासाठी पुढे येतात. मात्र कोणसरी असो की जैरामपूर – मुधोली शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यासाठी आणि जनसूनावणीत माणसं आणण्यासाठी पुढाकार घेणारे कोण आहेत हे सर्वांनी लक्षात घेण्यासारखे आहे. २०२२ साली एट्टापल्लीच्या नाक्यावर हजारो आदिवासी नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले, त्यावेळी काॅग्रेसचा एक मोठा नेता या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी येणार होता, पण त्या नेत्याला २०० ट्रकांचा ट्रान्सपोर्टचा ठेका भेटताच त्याने आंदोलनाकडे पाठ दाखवली परिणामी आज सुरजागडची लोहखाण सुरू राहिली आहे. आणि आता मलाईच्या हिस्सेवाटणी वरुन भाजप – काॅंग्रेस एकमेकांवर टिका – टिप्पणी करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या हितापेक्षा चमकोगिरीच्या आडून स्वतःचे आर्थिक हित साधायचे असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.

जिल्ह्यातील इतर परिसरातील कोणालाही आपल्या शेतजमिनी वाचवायच्या असतील तर आपल्यावरच्या अन्यायाचा मुळ असलेल्या प्रस्तावित लोह खाणी आणि जिल्हा उध्वस्त करु पाहणाऱ्या ‘गडचिरोली जिल्हा खनिज विकास प्राधिकरणा’ विरोधात सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. त्यासाठी खाण समर्थक भाजप – काॅंग्रेसचा त्याग करून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी खाण विरोधी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन डाव्या लोकशाही पक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्रकार परिषदेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळाचे सदस्य काॅ. डॉ. महेश कोपूलवार, शेतकरी कामगार पक्षाचे राज्य चिटणीस मंडळ सदस्य भाई रामदास जराते, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ.अमोल मारकवार, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, आसपा प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम,भाई शामसुंदर उराडे, जयश्रीताई वेळदा, ॲड. जगदीश मेश्राम, काॅ. सचिन मोतकुरवार, काॅ. सुरज जक्कुलवार, कविता ठाकरे, कविता मेश्राम, चंद्रकांत भोयर, डाॅ. धर्मराज सोरदे, प्रमोद कोसेकर, रमेश मेश्राम, विवेक खोब्रागडे, नागसेन खोब्रागडे, सुरेंद्र वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular