Monday, August 3, 2026
HomeGadchiroliगडचिरोलीत 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा-२०२६' चा उत्साहात शुभारंभ...

गडचिरोलीत ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा-२०२६’ चा उत्साहात शुभारंभ…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

गडचिरोली ,१५ एफ्रिल २०२६::-जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा-२०२६’ चा भव्य उद्घाटन समारंभ आज गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात संपन्न झाला. १५ ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या पंधरवड्यात जलसंपदा विभागामार्फत जलसंवर्धन आणि व्यवस्थापनावर आधारित विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

  कार्यक्रमाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाच्या प्राध्यापिका श्रीमती सविता सादमवार यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून विश्वशांतीदूत तथा जलप्रेमी श्री. प्रकाशजी अर्जुनवार उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाच्या प्राध्यापिका श्रीमती स्नेहा वनकर आणि प्रभू फाउंडेशन, चंद्रपूरचे अध्यक्ष श्री. राहुल गुडघाने, तसेच गडचिरोली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. राहुल मोरघडे यांची विशेष उपस्थिती होती.

प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन :-

• प्राध्यापिका सविता सादमवार यांनी ‘चिमणी’ या कवितेच्या माध्यमातून जलजागृती केली व उपस्थितांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले.

• श्री. प्रकाशजी. अर्जुनवार यांनी जलव्यवस्थापनासोबतच पिंपळ, वड, कडुनिंब यांसारख्या झाडांच्या संवर्धनाची आणि नद्यांच्या महत्त्वाची गरज प्रतिपादन केली.

• प्राध्यापिका स्नेहा वनकर यांनी पाणी बचतीमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग आणि जिर्ण झालेल्या पाण्याचे स्रोत पुनर्जिवीकरण करण्यावर भर दिला.

• श्री. राहुल गुडघाने यांनी महिला सक्षमीकरण आणि पाणी वापर संस्थांच्या बळकटीकरणावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अभियंता श्री. संतोष वाकोडे यांनी केले. कार्यकारी अभियंता श्री. राहुल मोरघडे यांनी संपूर्ण पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या रूपरेषेचे सादरीकरण केले. 

  या पंधरवड्यात गडचिरोली जिल्ह्यात जलसंपदा विभागाने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविणार आहे. यामध्ये जलसंपदा अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण, “स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय / जलपुनर्भरण (Rain Water Harvesting)”, शेतकरी संवाद, भूसंपादन व पुनर्वसन इत्यादी अडचणी निराकरण, कालवा संयुक्त पाहणी, कालवे स्वच्छता अभियान, उपसा सिंचनाचे पाणी परवानगी देण्यासाठी तक्रारीचे निरसन करणे, जलसंपदा व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पिक पद्धती बदल, उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन इत्यादी बाबत बैठक/कार्यशाळा मार्गदर्शन कार्यक्रम, सिंचन ई-प्रणाली, पाणी दर, पाणीपट्टी आकारणी व वसुली याबाबत तक्रारी निवारण, विद्यापीठ/KVK/सेवाभावी संस्था यांच्यासमवेत संवाद व कृती कार्यक्रम, महानगरपालिका/नगरपालिका/ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून पाणी वापराचा जललेखा परीक्षण, आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन (पुर/मालमत्तेचे रक्षण), महसूल विभागाच्या समन्वयादारे जमीनीचा ७/१२ उतारा काढणे/अतिक्रमण हटविणे, पाणी वापर संस्था समीकरण चर्चासत्र/कार्यशाळा इत्यादी उपक्रम यांचा समावेश आहे. तसेच या व्यतिरिक्त अनधिकृत पाणी वापर रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय लिपीक श्री. दीपक भांडेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपकार्यकारी अभियंता श्रीमती मनिषा कठाणे यांनी मानले. या कार्यक्रमाला जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, पाणी वापर संस्थेच सभासद आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular