Sunday, August 2, 2026
HomeGadchiroliअक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज...

अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई,

ग्रामपातळीपासून शहरांपर्यंत जबाबदाऱ्या निश्चित,

नागरिकांनी 1098/112 वर तातडीने माहिती द्यावी,

गडचिरोली ,१८ एफ्रिल २०२६::- अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. या दिवशी कुठल्याही प्रकारचा बालविवाह झाल्यास संबंधितांवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या आहेत.

बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने सविस्तर अॅक्शन प्लॅन तयार केला असून ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. तसेच शहरी भागात बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) यांना बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांकडून संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

बालविवाहात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये विवाह सोहळ्यात सेवा देणारे पंडित, धार्मिक गुरु, मंडप मालक, फोटोग्राफर, केटरिंग व्यवसायिक, लॉन्स मालक तसेच वाजंत्री यांचा समावेश असून, बालविवाहाला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कायद्याच्या कक्षेत आणले जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

अक्षयतृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे पार पडत असल्याने काही ठिकाणी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता असते. याची दखल घेत प्रशासनाने या वर्षी विशेष खबरदारी घेतली असून जिल्ह्यात एकही बालविवाह होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत.

बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 किंवा आपत्कालीन क्रमांक 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्राप्त माहिती गोपनीय ठेवण्यात येणार असून त्वरित कारवाई केली जाईल.

दरम्यान, मागील सहा वर्षांत राज्यात प्रशासनाने 5 हजार 421 बालविवाह थांबवले असून 401 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा महिला व बालविकास कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाने आतापर्यंत 17 बालविवाह रोखण्यात यश मिळवले असून बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 16(1) नुसार संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी दिली आहे.

जिल्ह्यात बालविवाहमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून नागरिकांनीही या सामाजिक प्रश्नाविरुद्ध सजग राहून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular