Wednesday, September 16, 2026
HomeEtapalliनेटवर्कअभावी त्रस्त रेखाभटाळवासीयांना दिलासा; Airtel सेवा पुन्हा सुरू...

नेटवर्कअभावी त्रस्त रेखाभटाळवासीयांना दिलासा; Airtel सेवा पुन्हा सुरू…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

CPIच्या पाठपुराव्याला यश; कायमस्वरूपी नेटवर्कसाठी सौरऊर्जा किंवा वीज जोडणीची मागणी,

गडचिरोली /एटापल्ली, 16 सप्टेंबर 2026::-ग्रामपंचायत गर्देवाडा अंतर्गत येणाऱ्या रेखाभटाळ गावातील गेल्या काही दिवसांपासून बंद असलेली Airtel मोबाईल नेटवर्क सेवा अखेर पुन्हा सुरू झाली आहे. नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, UPI व बँकिंग व्यवहार, ऑनलाइन शासकीय कामे तसेच नातेवाईक आणि आपत्कालीन सेवांशी संपर्क साधताना नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नेटवर्क सेवा सुरू झाल्याने गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रेखाभटाळ गावात Airtel नेटवर्क बंद असल्याने दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम झाला होता. विशेषतः डिजिटल व्यवहार आणि ऑनलाइन शासकीय सेवांसाठी नागरिकांना अडचणी येत होत्या. त्यामुळे गावकऱ्यांनी ही समस्या CPIच्या पदाधिकाऱ्यांकडे मांडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

गावकऱ्यांची समस्या गांभीर्याने घेत CPIने संबंधित यंत्रणा तसेच प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला. नेटवर्क सेवा पूर्ववत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यानंतर अखेर Airtelची सेवा पुन्हा सुरू झाली.

याबाबत CPIचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी सांगितले की, रेखाभटाळमधील नागरिकांनी नेटवर्क बंद असल्याची समस्या मांडल्यानंतर संबंधित यंत्रणेकडे तातडीने पाठपुरावा करण्यात आला. मोबाईल नेटवर्कसारखी मूलभूत सेवा नागरिकांना सातत्याने उपलब्ध होणे आवश्यक आहे. पाठपुराव्यानंतर नेटवर्क सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी भविष्यात पुन्हा अशी समस्या निर्माण होऊ नये, यासाठी टॉवरला कायमस्वरूपी वीज कनेक्शन अथवा सौरऊर्जा व्यवस्था उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

दरम्यान, कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सहसचिव आणि कॉ. सुरज जककुलवार यांनी नेटवर्क सेवा सातत्याने सुरू राहण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नेटवर्कची समस्या कायमस्वरूपी दूर झाल्यास विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना ऑनलाइन शिक्षण, डिजिटल व्यवहार, शासकीय सेवा आणि आपत्कालीन संपर्कासाठी मोठा फायदा होणार आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular