VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
कर्टिन विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण करून मायभूमीत परतले; लॉयड्समध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून कारकिर्दीची सुरुवात
गडचिरोली /एटापल्ली,10 सप्टेंबर 2026::- गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी आजही मोठे आव्हान आहेत. मात्र, जिद्द, गुणवत्ता आणि योग्य संधी मिळाल्यास याच मातीतून जागतिक स्तरावर भरारी घेता येते, हे एटापल्ली तालुक्यातील बांडे गावचे इग्नासियुस प्रकाश बडा यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. सुरजागड लोहखनिज खाण परिसरातील सामान्य कुटुंबातून आलेल्या इग्नासियुस यांनी ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित कर्टिन विद्यापीठातून ‘मास्टर इन इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्युअरशिप’ हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.
लॉयड्स इनफिनिटी फाउंडेशनच्या कर्टिन युनिव्हर्सिटी स्पॉन्सरशिप प्रोग्राममुळे संधी :-
इग्नासियुस बडा यांना लॉयड्स इनफिनिटी फाउंडेशनच्या कर्टिन युनिव्हर्सिटी स्पॉन्सरशिप प्रोग्रामच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. या प्रायोजकत्वांतर्गत शिक्षण शुल्कासोबतच निवास, प्रवास तसेच दैनंदिन गरजांची जबाबदारीही फाउंडेशनकडून घेण्यात आली. त्यामुळे मर्यादित आर्थिक परिस्थितीवर मात करत त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक वातावरणात शिक्षण घेता आले.
सात जणांच्या कुटुंबातून जागतिक व्यासपीठापर्यंत :-
बांडे गावातील सात जणांच्या कुटुंबात इग्नासियुस यांचे बालपण गेले. त्यांच्या आई सरिता या अंगणवाडी मदतनीस असून वडील प्रकाश बडा हे शेतकरी आहेत. साध्या आणि मर्यादित आर्थिक परिस्थितीतून आलेल्या इग्नासियुस यांच्यासाठी ऑस्ट्रेलियात जाऊन उच्च शिक्षण घेणे हे सुरुवातीला दूरचे स्वप्न होते. मात्र, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि क्षमतेची दखल घेत मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले.
परदेशात शिक्षण, पण मायभूमीशी नाते कायम :-
कर्टिन विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर इग्नासियुस यांनी ऑस्ट्रेलियातच स्थायिक होण्याचा मार्ग न निवडता आपल्या मायभूमीत परतण्याचा निर्णय घेतला. आता त्यांनी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली आहे. परदेशातील शिक्षण आणि अनुभवाचा उपयोग आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी करण्याची त्यांची इच्छा आहे.
‘मिळालेले ज्ञान गडचिरोलीच्या विकासासाठी वापरणार’ :-
बांडे गावापासून ऑस्ट्रेलियातील पर्थपर्यंतचा प्रवास हा आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणणारा ठरल्याचे इग्नासियुस यांनी सांगितले. या संधीमुळे आत्मविश्वास वाढला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळविलेले ज्ञान आणि अनुभव गडचिरोलीच्या विकासासाठी उपयोगात आणण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
स्थानिक युवकांना जागतिक संधी देण्याचा संकल्प :-
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर बी. प्रभाकरन यांनी २०२३ मध्ये स्थानिक युवकांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या ज्ञानाचा उपयोग स्थानिक विकासासाठी करण्याचा संकल्प व्यक्त केला होता. इग्नासियुस बडा यांचे यश हे त्या उपक्रमाच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
इग्नासियुस यांच्या यशाबद्दल बोलताना बी. प्रभाकरन यांनी हे केवळ एका विद्यार्थ्याचे यश नसून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे नमूद केले. दुर्गम भागातील युवकांना जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना आपल्या परिसराच्या प्रगतीत सहभागी होण्यासाठी सक्षम करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इग्नासियुस बडा यांचा प्रवास गडचिरोलीतील असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. दुर्गम भाग, मर्यादित आर्थिक परिस्थिती किंवा साधी कौटुंबिक पार्श्वभूमी ही यशाच्या मार्गातील अडचण ठरू नये, तर योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास गडचिरोलीतील विद्यार्थीही जगाच्या पाठीवर आपली ओळख निर्माण करू शकतात, याचे ते प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत.
