VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोलीत आपत्कालीन पीक नियोजनावर जिल्हास्तरीय कार्यशाळा,
गडचिरोली ,२६ जून २०२६::- बदलते हवामान, अनियमित पाऊस आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांमुळे शेतीपुढे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी कृषी विभागाने व्यापक तयारी सुरू केली असून, त्या अनुषंगाने जिल्हा नियोजन भवन, गडचिरोली येथे ‘एल निनो परिस्थितीत आपत्कालीन पीक नियोजन’ व ‘खेत बचाव अभियान’ या विषयावरील जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेत अध्यक्षीय मार्गदर्शन करताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्मा प्रकल्प संचालक श्रीमती प्रीती हिरळकर यांनी एल निनोमुळे उद्भवू शकणाऱ्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड, आंतरपीक पद्धती, जलसंधारण उपाय आणि ‘खेत बचाव अभियान’ प्रभावीपणे राबविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कृषी ताई, कृषी सखी, समूह सहाय्यक, कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी गावागावांत जाऊन आपत्कालीन पीक नियोजनाबाबत जनजागृती करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविकात श्रीमती हिरळकर यांनी कार्यशाळेच्या उद्देशाविषयी माहिती देत कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला. एल निनोच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत योग्य पीक नियोजनाचा संदेश पोहोचविणे आणि बदलत्या हवामानाशी सुसंगत शेती पद्धतींचा प्रसार करणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी एल निनो काळातील शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय, नैसर्गिक शेती तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. बी. मठवाले यांनी पशुधन व्यवस्थापन, चारा टंचाईवरील उपाय आणि पूरक दुग्धव्यवसायाचे महत्त्व स्पष्ट केले. कृषी विज्ञान केंद्र, सोनापूरचे विषय विशेषज्ञ डॉ. प्रीतम चिरडे यांनी कमी पावसाच्या परिस्थितीत पीक व्यवस्थापन, योग्य वाणांची निवड आणि जमिनीतील आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींची माहिती दिली. मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी श्रीमती नि. प्र. भुतांगे यांनी शेततळ्यांचा प्रभावी वापर करून मत्स्यव्यवसायातून अतिरिक्त उत्पन्न मिळविण्याचे मार्ग सांगितले. तंत्र अधिकारी श्री. आनंद कांबळे यांनी PMFME, MIDH, POCRA तसेच फळबाग लागवड यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. आत्मा गडचिरोलीचे प्रकल्प उपसंचालक श्री. रवी हरणे यांनी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (NMNF), शेतकरी गट बांधणी आणि क्षेत्रस्तरावरील कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या तांत्रिक सत्रात सहभागींच्या शंकांचे समाधान करण्यात आले. जिल्ह्यातील मोठ्या संख्येने कृषी सखी, कृषी ताई, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी या कार्यशाळेत सहभागी झाले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (वडसा) श्री. विनोद रहांगडाले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उपस्थितांनी गावागावांत एल निनोबाबत जनजागृती करून शेतकऱ्यांपर्यंत आपत्कालीन पीक नियोजनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.

