Sunday, September 13, 2026
HomeChamorshiचामोर्शी–हरनघाट नवीन रस्त्याच्या निकृष्ट नियोजनाचा फटका...

चामोर्शी–हरनघाट नवीन रस्त्याच्या निकृष्ट नियोजनाचा फटका…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

संपूर्ण रस्ता खोदल्याने पावसात चिखलाचे साम्राज्य; नागरिकांचे हाल, अपघातांचा धोका वाढला,

गडचिरोली/चामोर्शी,१७ जुलै २०२६::- चामोर्शी–हरनघाट (भेंडाळा मार्ग) या नवीन रस्त्याच्या कामातील निकृष्ट नियोजनामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याऐवजी संपूर्ण रस्ता एकाच वेळी खोदून त्यावर मुरूम टाकण्यात आल्याने पावसाच्या पाण्यात संपूर्ण मार्ग चिखलमय झाला आहे. परिणामी, या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून दुचाकीस्वारांचे वाहनांवरील नियंत्रण सुटत आहे. अनेक वाहनचालक घसरून पडत असून किरकोळ अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पादचारी, महिला, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वाहनचालकांना मोठी कसरत करत हा मार्ग पार करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांनी संबंधित कंत्राटदाराच्या कामकाजाच्या पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पावसाळ्याचा विचार न करता संपूर्ण रस्ता खोदल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, एका बाजूचे काम पूर्ण करून वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था केली असती तर नागरिकांना एवढा त्रास सहन करावा लागला नसता, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

या गंभीर परिस्थितीची संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घ्यावी, चिखलग्रस्त ठिकाणी खडी टाकून वाहतूक सुरळीत करावी, पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था करावी आणि रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण व युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी ज्ञानेश्वर वालदे यांनी केली आहे.

विकासकामांच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार नेमका कधी थांबणार? असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular