VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; विद्यार्थी, शेतकरी व रुग्णांची मोठी गैरसोय
गडचिरोली/चामोर्शी,३० जुलै २०२६::- गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता ग्रामीण भागाला बसू लागला आहे. चामोर्शी तालुक्यातील भोगनबोडी हेट्टी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने चामोर्शी–भोगनबोडी हेट्टी–जामगिरी हा प्रमुख संपर्क मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. रस्त्यावरून वेगाने पाणी वाहत असल्यामुळे सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सलग कोसळणाऱ्या पावसामुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. गावाकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने अनेक ठिकाणी पाण्याचा प्रवाह अत्यंत धोकादायक झाला आहे. काही नागरिकांनी जीव धोक्यात घालून दुचाकी हाताने ढकलत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, तर अनेकांना सुरक्षिततेच्या कारणास्तव अर्ध्यावरूनच परतावे लागले.

मार्ग बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली आहेत. तसेच रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावाचा संपर्क तुटल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, धोकादायक ठिकाणी बंदोबस्त ठेवावा तसेच पुराचे पाणी ओसरेपर्यंत नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला असल्याने नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यातून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
