VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
मातोश्री वृद्धाश्रमात मोफत नेत्रतपासणी शिबिर; मोफत चष्मे व मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा,
गडचिरोली/चामोर्शी,३० जुलै २०२६::- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा महोत्सव २०२६’ अंतर्गत गडचिरोली येथील मातोश्री वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी शिबिर उत्साहात पार पडले. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिरात तज्ज्ञ नेत्ररोगतज्ज्ञांनी वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांची सखोल नेत्रतपासणी केली. तपासणीनंतर आवश्यक लाभार्थ्यांना मोफत चष्मे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच मोतीबिंदू निदान झालेल्या रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया व उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
यावेळी बोलताना आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सांगितले की, “ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य जपणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यांच्या दृष्टीचे संरक्षण करून त्यांच्या आयुष्यात नवा प्रकाश आणणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी अशा सेवा उपक्रमांना सातत्य दिले जाईल.”
सेवा महोत्सव २०२६ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये या नेत्रतपासणी शिबिराचे विशेष महत्त्व असून, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच समाजाप्रती संवेदनशीलता आणि सेवाभाव जोपासण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा सेवाभिमुख उपक्रमांमुळे गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याचे मत व्यक्त केले.
