VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली/अहेरी,०४ ऑगस्ट २०२६::- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी कारागृहातून जामिनावर सुटका झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी सामाजिक बांधिलकी जपत रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली. त्यांच्या या कृतीची परिसरात चर्चा होत असून अनेकांनी तिचे स्वागत केले आहे.
एका प्रकरणात तब्बल ५२ दिवस चंद्रपूर कारागृहात राहिल्यानंतर ३ ऑगस्ट रोजी डॉ. कंकडालवार यांची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर त्यांनी जनतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पुन्हा लोकांमध्ये सक्रिय होण्यास सुरुवात केली.
दरम्यान, अहेरी तालुक्यातील मोदुमतूर्रा येथील देवाजी नामदेव आलम आणि त्यांची आई सुमन नामदेव आलम यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याची माहिती मिळताच डॉ. कंकडालवार यांनी रुग्णालयात धाव घेत दोन्ही रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. तसेच उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांच्या प्रकृतीची आणि सुरू असलेल्या उपचारांची सविस्तर माहिती घेतली.
रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना त्यांनी, “उपचारादरम्यान कोणतीही अडचण आल्यास निःसंकोच संपर्क साधा. आवश्यक ती मदत करण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी आहे,” असे आश्वासन दिले.
डॉ. कंकडालवार यांच्या भेटीमुळे रुग्णांच्या कुटुंबीयांना मानसिक आधार मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. परिसरातील नागरिकांनीही त्यांच्या या भेटीचे स्वागत करत जनतेशी असलेली आत्मीयता आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली.
यावेळी इंदाराम ग्रामपंचायतीचे सरपंच गुलाबराव सोयाम, कार्तिक तोगम, प्रशांत गोडसेलवार, नरेश गर्गम, ओमकार जक्कोजवार, प्रमोद गोडशेलवार आदी उपस्थित होते.
