VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,
राज्यमंत्री पंकजजी भोयर यांच्या हस्ते तर माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांची प्रमुख उपस्थिती,
गडचिरोली,१६ ऑगस्ट २०२६::- गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधून सन २०४७ पर्यंत ‘विकसित गडचिरोली’ निर्माण करण्याच्या दृष्टीने ‘व्हिजन गडचिरोली २०४७’ या दोन दिवसीय कार्यशाळेचे भव्य उद्घाटन राज्यमंत्री पंकज जी भोयर यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या पुढाकाराने आणि ‘आकांक्षित जिल्हा ते विकसित गडचिरोली २०४७ कृती/निर्माण समिती’च्या वतीने १६ व १७ ऑगस्ट २०२६ रोजी आर. के. सेलिब्रेशन हॉल, गडचिरोली येथे या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षेचा जिल्हा ही ओळख पुसून गडचिरोली विकासाचे मॉडेल बनेल: राज्यमंत्री पंकजजी भोयर :-
कार्यक्रमाचे उद्घाटन करताना राज्याचे राज्यमंत्री पंकजी भोयर यांनी ‘व्हिजन गडचिरोली’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. “पूर्वी सनदी अधिकाऱ्यांमध्ये गडचिरोलीत बदली झाली की शिक्षेची भीती असायची; परंतु आता ती वेळ राहिलेली नाही. अधिकारी वर्ग हसत-खेळत आणि कुठलीही भीती न बाळगता गडचिरोलीत येत आहे. हा जिल्हा केवळ आदिवासी जिल्हा न राहता, येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात विकासाच्या दृष्टीने एक अग्रगण्य जिल्हा म्हणून ओळखला जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी केंद्रातील आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण योजना जिल्ह्यात आणल्याचा विशेष उल्लेख करत, ते आपले वर्धा जिल्ह्याचे निकटवर्ती असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वे, सिंचन व वैद्यकीय महाविद्यालयामुळे जिल्ह्याचा कायापालट: माजी खासदार डॉ. अशोकजी नेते :-
उपस्थित कार्यशाळेच्या जनसमुदायाला मार्गदर्शन करताना माजी खासदार तथा भाजपा अनुसुचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते म्हणाले की, गडचिरोलीच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. आपल्या कार्यकाळात रेल्वेचे चारही मार्ग जिल्ह्यात खेचून आणले. याशिवाय सिंचनाचे प्रलंबित प्रश्न,चिचडोह कोडगल बॅरेज,आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज),केंद्रीय विघालय, सुरजागड, कोनसरी प्रकल्प, यांसारखे मोठे प्रकल्प मार्गी लावले असून जिल्ह्याच्या विकासाची ही गती अशीच कायम राहील, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी केले.
यावेळी प्रामुख्याने आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे,कि.मो.प्र.स.रमेश भुरसे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जेष्ठ नेते प्रमोद पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, शहराध्यक्ष तथा न.प. सभापती अनिल कुनघाडकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका योगिता पिपरे, यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
