Saturday, September 5, 2026
HomeDesaiganjजंगली हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करा; अन्यथा धरणे आंदोलनाचा इशारा...

जंगली हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करा; अन्यथा धरणे आंदोलनाचा इशारा…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव नुकसानभरपाई देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी,

गडचिरोली/देसाईगंज (वडसा),१६ ऑगस्ट २०२६::-तालुक्यातील विविध गावांमध्ये जंगली हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव नुकसानभरपाई द्यावी, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वनविभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याची पूर्वसूचना देण्यात आली आहे.

देसाईगंज तालुक्यातील चिचोली, रिठ, हलबी तसेच इतर परिसरात सुमारे ३५ जंगली हत्तींच्या कळपाने प्रवेश करून शेतकऱ्यांच्या धान रोवणी, मका, सोयाबीन, शेवगा यासह शेतीच्या उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच शिवमंदिर परिसरातील नंदीची मूर्तीही हत्तींच्या हल्ल्यात नुकसानग्रस्त झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

हत्तींच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी भयभीत असून, वनविभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन मुख्य वनसंरक्षक, गडचिरोली यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही हत्तींचा बंदोबस्त व नुकसानभरपाईबाबत ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तालुका देसाईगंज-वडसा यांच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना सोबत घेऊन १८ ऑगस्ट २०२६ रोजी देसाईगंज वनविभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे पूर्वसूचना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

हत्तींचा तात्काळ बंदोबस्त करावा, सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना वाढीव नुकसानभरपाई द्यावी, तसेच नुकसानग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा, या प्रमुख मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. मागण्यांची पूर्तता करून १८ ऑगस्टपूर्वी ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी वनविभाग व प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते तसेच जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष जंगली हत्तींच्या वाढत्या उपद्रवाकडे वेधण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular