VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
८ सप्टेंबरला चित्तरंजनपूर येथे सहविचार सभा; शेतकरी, शेतमजूर, महिला व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
गडचिरोली /चामोर्शी, 07 सप्टेंबर 2026::- येणापूर-जयरामपूर परिसरातील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासाठी १३ गावांतील जमिनींच्या प्रस्तावित भूसंपादनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. भूसंपादन कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी आता सर्व राजकीय पक्षांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रित भूमिका घ्यावी, यासाठी सर्वपक्षीय सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रस्तावित भूसंपादनामुळे शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या शेती व उपजीविकेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. यासोबतच रोजगार, जलस्रोत, पर्यावरण आणि भावी पिढ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या ५ जून २०२६ रोजीच्या पत्रानुसार बाधित शेतकऱ्यांना हरकती नोंदविण्यासाठी कालावधी वाढविण्यात आला असून, मुख्यमंत्री यांच्या अंतिम निर्णयापर्यंत भूसंपादनाची पुढील प्रक्रिया स्थगित ठेवण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर १३ गावांतील नागरिकांची एकजूट करून पुढील दिशा ठरविण्यासाठी ही सभा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
८ सप्टेंबरला चित्तरंजनपूर येथे सभा :-
दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता चित्तरंजनपूर (येणापूर) येथे सर्वपक्षीय सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘१३ गावांचा निर्णय—प्रस्तावित भूसंपादन कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय भूमिका’ हा सभेचा प्रमुख विषय राहणार आहे.
सभेत बाधित शेतकरी व नागरिकांच्या समस्या, हरकती आणि भावना जाणून घेऊन भूसंपादनाविरोधात ठोस व एकत्रित भूमिका निश्चित करण्याबाबत चर्चा होणार आहे. हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून १३ गावांचे अस्तित्व, शेती आणि नागरिकांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न असल्याने सर्व राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
‘शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे,’ अशी भूमिका आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, १३ गावांतील शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली भूमिका मांडावी आणि भूसंपादनाविरोधातील लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
