Monday, September 7, 2026
HomeChamorshiचिखलमय रस्त्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप; दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन...

चिखलमय रस्त्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप; दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

महाविद्यालयाकडे जाणारा मार्ग धोकादायक; प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी,

गडचिरोली /चामोर्शी, 07 सप्टेंबर 2026::- केवळरामजी हरडे कॉलेज ऑफ एग्रीकल्चर, चामोर्शी येथे जाणाऱ्या खराब व चिखलमय रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी रविवारी आंदोलन केले. पावसामुळे रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, या मार्गावरून ये-जा करताना विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी मुरूम टाकण्यात आला होता. मात्र, पावसामुळे हा मुरूम चिखलात मिसळल्याने रस्त्यावर सर्वत्र दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे दुचाकी घसरून पडण्याच्या घटना घडण्याची शक्यता वाढली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भिवापूर, वलसरा आणि आमगाव परिसरातील नागरिकांसाठीही हा महत्त्वाचा मार्ग असून, दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ या रस्त्याचा वापर करतात. मात्र, पावसाळ्यात रस्त्याची परिस्थिती अधिकच गंभीर होत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वृक्षारोपणातून प्रशासनाचे वेधले लक्ष :-

आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या परिसरात वृक्षारोपण करून प्रशासनाचे अनोख्या पद्धतीने लक्ष वेधले. रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी तसेच विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना सुरक्षित व पक्का रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको :-

प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. प्रशासनाकडून लवकरात लवकर ठोस कारवाई झाली नाही, तर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन छेडतील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित हा गंभीर प्रश्न असून, प्रशासनाने केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती व पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी विद्यार्थी व ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular