VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गडचिरोली /वसंतपूर, 07 सप्टेंबर 2026::-श्री गणेश युवा फुटबॉल क्लब, वसंतपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेचा शुभारंभ गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी उपस्थित युवा खेळाडूंशी संवाद साधत त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागात अनेक प्रतिभावान खेळाडू असून त्यांना योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. अशा स्पर्धांच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते. वसंतपूरसह संपूर्ण विधानसभा मतदारसंघातील क्रीडा क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे आमदार नरोटे यांनी यावेळी सांगितले.
खेळाडूंनी शिस्त, संघभावना आणि खिलाडूवृत्ती जपत उत्कृष्ट कामगिरी करावी. विजय-पराजयापेक्षा खेळातील सहभाग, सातत्य आणि कौशल्यविकास महत्त्वाचा असून खेळताना सुरक्षिततेचीही पूर्ण काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
स्थानिक पातळीवर क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी श्री गणेश युवा फुटबॉल क्लबकडून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे आमदार नरोटे यांनी कौतुक केले. युवा खेळाडूंच्या प्रगतीसाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वसंतपूर येथे दरवर्षी अशाच प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन होऊन ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघ व खेळाडूंना उपस्थित मान्यवरांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.:-
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भास्करजी पोहनकर, दुलालजी मंडल, तपनजी सरकार, भाजप घोट-आष्टी तालुकाध्यक्ष राकेशजी सरकार, भाजयुमोचे नरेशजी अलसवार, पवनजी रामगिरवार, हरिशजी माकडे, रजतजी वंजारी, शुभमजी बालेकरम यांच्यासह भाजयुमो गडचिरोलीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने युवा खेळाडू उपस्थित होते.
