Thursday, September 17, 2026
HomeGadchiroliदुर्गम शाळांमध्ये मूलभूत सुविधा पोहोचविण्यास प्रशासन कटिबद्ध – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा...

दुर्गम शाळांमध्ये मूलभूत सुविधा पोहोचविण्यास प्रशासन कटिबद्ध – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा…

VAINGANGA NEWS / विशेष प्रतिनिधी,

‘प्रोजेक्ट H₂OPE’ला गती; १३४ शासकीय शाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, २६ हजारांहून अधिक विद्यार्थी व नागरिकांना लाभ,

गडचिरोली,१७ सप्टेंबर २०२६ ::-गडचिरोलीसारख्या भौगोलिकदृष्ट्या दुर्गम आणि विखुरलेल्या वस्तीच्या जिल्ह्यातील शेवटच्या शाळेपर्यंत विद्यार्थ्यांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यासाठी सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी ही अत्यंत महत्त्वाची गरज असून, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यास प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सामंजस्य करारानंतर ह्युंडाई मोटर इंडिया फाउंडेशनच्या ‘प्रोजेक्ट H₂OPE’ उपक्रमाला गडचिरोली जिल्ह्यात आणखी गती मिळाली आहे. या उपक्रमाच्या सध्याच्या टप्प्यात जिल्ह्यातील १३४ शासकीय शाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या आधुनिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत.

सोनापूर येथील कमलाताई मुनघाटे हायस्कूल येथे या सुविधांच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम पार पडला. संबंधित शाळांमध्ये आरओ युनिट्स, वॉटर कूलर्स तसेच सहा स्तरीय पाणी साठवणूक टाक्या बसविण्यात आल्या आहेत. या सुविधांचा २६ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना लाभ होणार असून, या टप्प्यासाठी तब्बल २ कोटी ९५ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडच्या क्रिएटिंग शेअर्ड व्हॅल्यू विभागाचे मॅनेजर आदित्य इंगळे, सिनियर मॅनेजर अविक दुबे, ‘सुविधा’ संस्थेचे हेड – सस्टेनेबल ॲग्रीकल्चर योगेश उप्रेती यांच्यासह संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सुविधा देण्यास प्राधान्य :-

जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले की, गडचिरोली जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा असून अनेक शाळा अतिदुर्गम आणि दुर्गम भागात आहेत. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि मूलभूत सोयी पोहोचविण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सामंजस्य करारानंतर ह्युंडाई मोटर इंडिया फाउंडेशन आणि सहयोगी संस्थांनी १३४ शाळांमध्ये जलशुद्धीकरण सुविधा उभारण्याचे काम पूर्ण केले आहे. शाळांमध्ये सुरक्षित आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यासोबतच शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक पोषक होण्यास मदत होणार आहे.

३८४ शासकीय शाळांपर्यंत ‘H₂OPE’चा विस्तार :-

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात ‘H₂OPE’ उपक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या उपक्रमाचा विस्तार करण्यात आला आहे. सध्याच्या १३४ शाळांच्या टप्प्यासह आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३८४ शासकीय शाळांपर्यंत हा उपक्रम पोहोचला आहे.

या उपक्रमाचा आतापर्यंत एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ झाला असून, जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आतापर्यंत ८ कोटी ३६ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होत आहे.

‘विद्यांजली’ पोर्टलचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन :-

गडचिरोली जिल्ह्यातील शाळांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी शासनाच्या ‘विद्यांजली’ पोर्टलचा प्रभावी वापर करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी पंडा यांनी केले.

शाळांच्या पायाभूत सुविधा, शैक्षणिक साहित्य तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींमध्ये सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था आणि CSR कंपन्यांनी पुढाकार घ्यावा. ‘विद्यांजली’ पोर्टलवर शाळांनी नोंदविलेल्या प्रत्यक्ष गरजांनुसार सहकार्य केल्यास दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आवश्यक सुविधा अधिक प्रभावीपणे पोहोचविता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, सामाजिक संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्या समन्वयातून गडचिरोली जिल्ह्यातील शाळांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न यापुढेही सातत्याने सुरू राहतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular