Thursday, September 17, 2026
HomeGadchiroliआरमोरीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची मोठी खेप जप्त; ४५.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगत...

आरमोरीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची मोठी खेप जप्त; ४५.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगत…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

स्थानिक गुन्हे शाखा व आरमोरी पोलिसांची संयुक्त कारवाई; छत्तीसगडमधील एकाला अटक, दुसरा आरोपी फरार,

गडचिरोली, १७ सप्टेंबर २०२६ ::-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसायांविरोधात गडचिरोली पोलीस दलाने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. आरमोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकवर स्थानिक गुन्हे शाखा व आरमोरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल ४५ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ट्रकचालकाला अटक करण्यात आली असून, तंबाखूचा माल पाठविणाऱ्या दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची विक्री व वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध व्यवसायांविरोधात प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

गोपनीय माहितीच्या आधारे ट्रक पकडला :- 

आरमोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरखेडा ते आरमोरी मार्गावरून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा सहाचाकी ट्रकमधून वाहतूक केला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित मार्गावर सापळा रचून पाळत ठेवली. दरम्यान, संशयास्पद आयशर ट्रक येताना दिसताच पोलिसांनी तात्पुरता अडथळा निर्माण करून वाहन थांबविले.

ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुढील कारवाई केली.

विविध कंपन्यांच्या तंबाखूचा साठा जप्त :-

कारवाईदरम्यान पोलिसांनी खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त केला.

बागबान च्युइंग टोबॅकोचे ५२० बॉक्स — १४ लाख ४ हजार रुपये.

डीजे प्रीमियम क्वालिटी सुगंधित तंबाखूचे १,३२० पाऊच — ५ लाख ९४ हजार रुपये.

झेड ब्लॅक प्रीमियम क्वालिटी सुगंधित तंबाखूचे १,६०० पाऊच — ५ लाख ६० हजार रुपये.

क्रेझ सुगंधित तंबाखूचे १,३२० पाऊच — ४ लाख ६५ हजार रुपये.

आयशर कंपनीचा सहाचाकी मालवाहू ट्रक (क्र. सीजी ०८ झेड ८७९२) — अंदाजे १५ लाख रुपये.

अशा प्रकारे तंबाखूचा साठा व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या ट्रकसह एकूण ४५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

छत्तीसगडमधील आरोपीला अटक :-

ट्रक आरमोरी पोलीस ठाण्यात आणल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष वाहनचालकाची चौकशी केली. त्यावेळी त्याने आपले नाव शाहु धर्मेशकुमार इंदेरमन (वय २८), रा. जोशीलमती, गेंदाटोला, जिल्हा राजनांदगाव, छत्तीसगड असे सांगितले.

पुढील चौकशीत हा तंबाखूचा माल टेमन बेदराम साहू, रा. जोशीलमती, जिल्हा राजनांदगाव (छत्तीसगड) याचा असल्याचे चालकाने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल :-

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोलीचे अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश तोरेम यांच्या फिर्यादीवरून आरमोरी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ४१३/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी शाहु धर्मेशकुमार इंदेरमन याच्यासह टेमन बेदराम साहू याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ व ३(५), तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू होती. दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रताप लामतुरे करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई :-

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज. जी. आणि सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फगडे आणि आरमोरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन झनक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर कराळे व पोलीस अंमलदारांनी ही संयुक्त कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

प्रतिबंधित तंबाखूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधातील मोहिमेला अधिक गती मिळाली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular