VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
शेतीमालाला योग्य भाव, धान खरेदी, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मदत ₹५० लाख करण्याची मागणी,
महामार्ग व उद्योगांसाठी शेतकरी-स्थानिकांना विश्वासात घेण्याचे आवाहन,
चंद्रपूर, 17 सप्टेंबर 2026::- गडचिरोली जिल्ह्यासह चिमूर आणि ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक तसेच युवकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चंद्रपुरात महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेण्यात आली. काँग्रेसचे महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
शेतीमालाला योग्य भाव मिळणे, धान खरेदी प्रक्रियेतील अडचणी दूर करणे, शेतजमिनीशी संबंधित प्रश्न, नुकसानभरपाई, कृषीविषयक प्रलंबित मागण्या, सिंचनाच्या सुविधा, शेतीमालाची वाहतूक, बाजारपेठ तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळविताना येणाऱ्या अडचणी याकडे पत्रकार परिषदेत लक्ष वेधण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील मोठा वर्ग शेतीवर अवलंबून असून दुर्गम आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनेक मूलभूत सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मदत ₹५० लाख करण्याची मागणी :-

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे आर्थिक आणि सामाजिक संकट ओढवते. सध्या देण्यात येणारी ₹२५ लाखांची आर्थिक मदत वाढवून ₹५० लाख करण्यात यावी. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अवैध तंबाखू, गुटख्याविरोधात कठोर कारवाईची मागणी :-
ग्रामीण व शहरी भागात अवैध बनावटी तंबाखू, गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री रोखण्यासाठी प्रभावी कारवाई करण्याची मागणीही पत्रकार परिषदेत करण्यात आली. तंबाखूजन्य पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून कॅन्सरसह विविध आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, असे सांगण्यात आले.
समृद्धी महामार्गाबाबत शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याची मागणी :-

गडचिरोली, ब्रह्मपुरी आणि भंडारा परिसरातून प्रस्तावित असलेल्या समृद्धी महामार्गाच्या अनुषंगाने स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्यात यावा, अशी भूमिका मांडण्यात आली. महामार्गासाठी जमीन संपादन करताना शेतकऱ्यांच्या जमिनीवर होणारा परिणाम, त्यांच्या उपजीविकेचे साधन आणि स्थानिक परिस्थितीचा सर्वंकष विचार करावा. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी करण्यात आली.
MIDCमध्ये उद्योग आणून स्थानिकांना रोजगार द्या :-

MIDCची जागा उपलब्ध असतानाही गेल्या १५ वर्षांत परिसरात एकही मोठा उद्योग उभारला गेला नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. परिणामी स्थानिक युवक आणि बेरोजगारांना रोजगाराच्या शोधात इतर शहरांकडे किंवा जिल्ह्याबाहेर जावे लागत असल्याचे सांगण्यात आले. MIDC परिसरात नवीन उद्योग आणून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या जमिनी, त्यांच्या उपजीविकेचे साधन आणि शेतीशी निगडित विविध प्रश्नांबाबत शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडण्यात आली. संबंधित विभागांनी या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने पाठपुरावा करीत राहील, असे महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रपूर शंतनू धोटे, नागभीड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद चौधरी, युवक काँग्रेस चिमूर विधानसभा अध्यक्ष प्रशांत डवले, माजी जिल्हा महासचिव युवक काँग्रेस रोहन नन्नावरे, कार्याध्यक्ष चिमूर युवक काँग्रेस सजित कारेकार, विधानसभा महासचिव चिमूर कुंदन पडवेकर, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत राऊत, जिल्हा उपाध्यक्ष गडचिरोली अनिल कोठारे, ओबीसी जिल्हा कार्याध्यक्ष गडचिरोली दिवाकर निसार, विपुल येलटीवार, कृषी उत्पन्न बाजार समिती सावलीचे सभापती प्रमोद दाजगाये, युवक विधानसभा उपाध्यक्ष चिमूर अमर नवघडे, युवराज घोटेकर, राजेंद्रनाथ मेश्राम, हरीश मुंडे, अनु. जाती जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर चेतन खोब्रागडे, हितेश ठाकरे, पवन नवघडे, समीर कुळमेथे, शुभम कुळमेथे, दीपक ठाकरे, सचिन वाटगुरे, भगवान डाकारे, कृष्णा कोहपरे, रामाजी हुलके, राजेश भोंडे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते.
