VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
१०० प्रत्यक्ष, तर २०० ऑनलाइन नोंदणी; समाजातील विवाहयोग्य स्थळांना मिळाले एकाच व्यासपीठावर स्थान,
गडचिरोली /चामोर्शी, 02 नोव्हेंबर 2026::-समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चामोर्शी येथे आयोजित तेली समाजाचा भव्य वधू-वर व पालक परिचय मेळावा उत्साहात पार पडला. रविवार, १ नोव्हेंबर रोजी श्री द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्थेच्या सौजन्याने इम्पेरियल मंगल कार्यालयात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या मेळाव्यात तब्बल १०० वधू-वरांची प्रत्यक्ष नोंदणी करण्यात आली, तर २०० युवक-युवतींनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली. अशा प्रकारे एकूण ३०० विवाहयोग्य वधू-वरांची नोंदणी झाल्याने मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले. यावेळी व्यासपीठावरून युवक-युवतींनी स्वतःचा परिचय करून दिला. त्यामुळे वधू-वरांसह पालकांनाही विविध स्थळांची माहिती एकाच ठिकाणी मिळण्याची संधी उपलब्ध झाली.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे (गडचिरोली) यांच्या हस्ते करण्यात आले. सहउद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिताताई मधुकर भांडेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मार्कंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा सावतेली समाजाचे सदस्य गजाननजी भांडेकर होते.
प्रमुख अतिथी म्हणून नगरपंचायत चामोर्शीचे उपाध्यक्ष लोमेश बुरांडे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, इम्पेरियल फंक्शन हॉलचे मालक चुडाराम सातपुते, एम. डी. चलाख, तुळशीदास कुनघाडकर, दौलतराम कोठारे, राधेश्याम घोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
गडचिरोली जिल्ह्यातील तेली समाजातील शिक्षित व उच्चशिक्षित युवक-युवतींना विवाहासाठी योग्य स्थळे उपलब्ध करून देणे, विवाह जुळविण्याच्या प्रक्रियेत लागणारा वेळ व खर्च कमी करणे, समाजातील परस्पर संबंध अधिक दृढ करणे आणि हुंडामुक्त विवाह पद्धतीला प्रोत्साहन देणे, हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश होता. या उपक्रमामुळे विवाह इच्छुक युवक-युवती आणि त्यांच्या पालकांना एकाच व्यासपीठावर संवाद साधण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली.
मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी श्री द्वारकाप्रसाद सातपुते, अमोल कुकडकर, कृष्णा बोदलकर, द्रोणार्थ सातपुते, विवेक सातपुते, जिजाबाई सातपुते, आशिष चलाख, उष्टुजी चलाख, यशवंत भांडेकर, दिलीप उडान, सुनील जुवारे, मोरेश्वर कोठारे, गोपिचंद बोदलकर, पवन सातपुते यांच्यासह समाजातील अनेक युवकांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक द्वारकाप्रसाद सातपुते यांनी केले. संचालन शिक्षक गजानन बारसागडे यांनी केले, तर गोपिचंद बोदलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
