Sunday, November 1, 2026
HomeChamorshiकरपलेल्या धानपिकाने हिरावले शेतकऱ्याचे जगणे; कर्जफेडीच्या चिंतेत ३६ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या...

करपलेल्या धानपिकाने हिरावले शेतकऱ्याचे जगणे; कर्जफेडीच्या चिंतेत ३६ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

भेंडाळा परिसरात हळहळ; अवकाळी पावसाच्या प्रतीक्षेत हातचे पीक गेले, आर्थिक संकटाने शेतकरी खचला,

गडचिरोली /चामोर्शी, 01 नोव्हेंबर 2026::-निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे झालेले नुकसान आणि डोक्यावर असलेल्या कर्जाचा वाढता भार यामुळे आणखी एका शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वेळेवर पाऊस न पडल्याने शेतातील धानपीक करपून गेले. यंदा शेतीतून उत्पादन होण्याची आशा मावळल्याने बँकेचे कर्ज कसे फेडायचे, या आर्थिक विवंचनेतून भेंडाळा येथील ३६ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेने भेंडाळा परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सचिन सातपूते यांचा दुर्दैवी अंत :-

सचिन भाऊजी सातपूते (वय ३६, रा. भेंडाळा, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सकाळी सुमारे ८ वाजताच्या दरम्यान सचिन सातपूते हे आपल्या शेतावर गेले होते. यंदा वेळेवर पाऊस न झाल्याने त्यांच्या शेतातील धानपीक करपून गेले होते. पिकांची झालेली दुरवस्था पाहून यंदा शेतीतून अपेक्षित उत्पादन मिळणार नाही, अशी चिंता त्यांना सतावत होती. त्यातच बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, अशा आर्थिक विवंचनेत ते होते.

याच परिस्थितीत त्यांनी स्वतःच्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेतल्याची माहिती समोर आली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली.

चामोर्शी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद :-

घटनेची माहिती मिळाल्यानंतर चामोर्शी पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली. पोलीस स्टेशन चामोर्शी येथे मर्ग क्रमांक ६९/२०२६, कलम १९४ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शिवदास दुर्गे (ब.नं. २४२६), पोलीस स्टेशन चामोर्शी करीत आहेत.

शेतकऱ्यांच्या संकटाकडे लक्ष देण्याची गरज :-

एका कष्टकरी शेतकऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण भेंडाळा परिसर सुन्न झाला आहे. निसर्गाच्या अनिश्चिततेमुळे पिकांचे नुकसान, वाढता शेतीखर्च आणि कर्जफेडीची चिंता यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे. शेतकऱ्यांना संकटाच्या काळात वेळीच आर्थिक मदत, पीक नुकसानीची योग्य भरपाई आणि समुपदेशनाचा आधार मिळणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव या घटनेने करून दिली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular