Sunday, November 1, 2026
HomeGadchiroliवनहक्क पट्ट्यांसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवा; अन्यथा जिल्हाभर तीव्र जनआंदोलन छेडणार...

वनहक्क पट्ट्यांसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवा; अन्यथा जिल्हाभर तीव्र जनआंदोलन छेडणार…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

डॉ. प्रणय भाऊ खुणे यांचा राज्य सरकारला इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्याचा निर्धार,

गडचिरोली, 01 नोव्हेंबर 2026::-गडचिरोली जिल्ह्यात सन २०११-१२ पासून वनहक्क जमिनींचे दावे दाखल करूनही अद्याप वनहक्क पट्ट्यांपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (असोसिएशन), नवी दिल्लीच्या वतीने करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या वनहक्क पट्ट्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली न काढल्यास संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी दिला आहे.

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने जिल्ह्यातील वनहक्क पट्ट्यांच्या प्रश्नावर पुढाकार घेतल्यानंतर जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील अनेक गरीब व गरजू शेतकरी संघटनेशी संपर्क साधून आपल्या समस्या मांडत आहेत. नुकतेच चामोर्शी तालुक्यातील मक्केपल्ली, चक चापलवाडा, गोलबंद्री, मंजेगाव, किसाननगर आणि घोट येथील ११ शेतकऱ्यांनी वनहक्क पट्टे मिळण्याबाबत संघटनेकडे लेखी तक्रार व निवेदन सादर केले. या शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी डॉ. प्रणय भाऊ खुणे यांच्याकडेही साकडे घातले.

जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी सन २०११-१२ पासून वनहक्क जमिनींसाठी दावे दाखल केले आहेत. मात्र, विविध किरकोळ त्रुटींचे कारण पुढे करून त्यांचे प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. शासनाकडून वेळोवेळी त्रुटींची पूर्तता करण्याबाबत पत्रे मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वारंवार केली. तरीदेखील जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या दाव्यांवर अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसल्याने अनेक शेतकरी आजही वनहक्क पट्ट्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

वर्षानुवर्षे शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. या गंभीर प्रश्नाकडे राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन प्रलंबित वनहक्क दाव्यांची तपासणी करावी, पूर्ण कागदपत्रे असलेल्या पात्र दावेदारांना त्वरित वनहक्क पट्टे मंजूर करावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे.

यापुढे या प्रश्नावर केवळ निवेदने देऊन थांबणार नसल्याचे स्पष्ट करत डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वनहक्क पट्ट्यांपासून वंचित शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. गरज पडल्यास गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्हाभरातील वनहक्क दावेदार शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, राणी गोपशेटवार, उपाध्यक्ष महेश विश्वास, संदीप भोवरे यांच्यासह विविध तालुक्यांतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वनहक्क पट्ट्यांचा प्रश्न हा हजारो कुटुंबांच्या उपजीविकेशी आणि हक्कांशी निगडित असल्याने शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular