Sunday, November 1, 2026
HomeChamorshiनवोदय प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह! रँक ५३ मिळवणाऱ्या पियुषला प्रवेश नाकारल्याचा पालकांचा आरोप...

नवोदय प्रवेश प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह! रँक ५३ मिळवणाऱ्या पियुषला प्रवेश नाकारल्याचा पालकांचा आरोप…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

तक्रारीला १ महिना १० दिवस उलटूनही कार्यवाही नाही; न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा,

गडचिरोली /चामोर्शी, 01 नोव्हेंबर 2026::-प्रवेश परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करूनही जवाहर नवोदय विद्यालय, घोट येथील इयत्ता सहावीच्या प्रवेशापासून वंचित राहिल्याचा आरोप करत वाघोली येथील पियुष कालिदास पोरटे याच्या पालकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. परीक्षेत ओव्हरऑल रँक ५३ मिळूनही अंतिम प्रवेश यादीत पियुषचे नाव नसल्याने प्रवेश प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, पियुषपेक्षा एक क्रमांक मागे म्हणजेच रँक ५४ असलेल्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाल्याचा दावा पालकांनी केला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पियुषला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

या संदर्भात पालक कालिदास रामदास पोरटे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, पियुषने जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावीच्या प्रवेश परीक्षेत सहभाग घेतला होता. परीक्षेत त्याला ओव्हरऑल रँक ५३ मिळाल्याचे असतानाही अंतिम निवड यादीत त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले नाही. दुसरीकडे, रँक ५४ असलेल्या विद्यार्थ्याची निवड झाल्याचा दावा असल्याने या निवड प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

चार प्रमुख कार्यालयांकडे तक्रार; मात्र अद्याप उत्तराची प्रतीक्षा :-

या कथित अन्यायाविरोधात कालिदास पोरटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी तसेच जवाहर नवोदय विद्यालय प्रशासनाकडे लेखी निवेदने सादर केली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून तब्बल १ महिना १० दिवसांचा कालावधी उलटला, तरीही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.

नवोदय प्रवेश प्रक्रियेमध्ये ग्रामीण-शहरी प्रवर्ग, आरक्षण आणि अन्य निर्धारित निकष लागू असतात. त्यामुळे केवळ रँकच्या आधारे निवडीचा निष्कर्ष काढता येत नसला, तरी पियुषची निवड नेमक्या कोणत्या कारणामुळे झाली नाही, याची अधिकृत माहिती पालकांना देणे आवश्यक आहे. अंतिम निवड यादी, आरक्षणाचे निकष आणि पोर्टलवर नोंदविलेल्या निवडीची सखोल पडताळणी करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण :-

वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याने पालकांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. पियुषच्या प्रवेशाबाबत योग्य निर्णय घेऊन या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा कालिदास रामदास पोरटे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

पोर्टलनुसारच प्रवेश दिले जातात : उपप्राचार्य राजन गजभे :-

या प्रकरणाबाबत जवाहर नवोदय विद्यालय, घोटचे उपप्राचार्य राजन गजभे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, प्रवेश प्रक्रिया पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येते. संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश पोर्टलवर प्राप्त झालेल्या यादीनुसारच विद्यालयाच्या स्तरावरून देण्यात आले आहेत. प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया विद्यालयाच्या स्तरावर होत नसल्याने संबंधितांनी ज्या स्तरावरून ही प्रक्रिया नियंत्रित केली जाते, त्या स्तरावर न्याय मागावा.

गुणवत्तेचा प्रश्न की प्रवेश प्रक्रियेतील निकषांचा?:-

एका विद्यार्थ्याच्या शैक्षणिक भविष्याशी संबंधित हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. पालकांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि विद्यालय प्रशासनाने दिलेली प्रतिक्रिया लक्षात घेता, प्रवेश प्रक्रियेतील तांत्रिक बाबी, आरक्षणाचे निकष आणि अंतिम निवड यादी याबाबत प्रशासनाने स्पष्टता आणणे गरजेचे आहे. पियुषच्या निवडीबाबत नेमकी वस्तुस्थिती काय, याची अधिकृत माहिती समोर आल्यास या प्रकरणातील संभ्रम दूर होऊ शकतो.

या पत्रकार परिषदेला कालिदास पोरटे, राहुल पोरटे (माजी उपसरपंच, वाघोली), निलम पोरटे, स्वप्निल चिंतलवार, प्रतीक खोब्रागडे आदी उपस्थित होते.

आता प्रशासन या तक्रारीची दखल घेऊन चौकशी करणार का? पियुषच्या प्रवेशाबाबत वस्तुस्थिती स्पष्ट होणार का? की पालकांना न्यायासाठी आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागणार? याकडे वाघोलीसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular