VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
819 जणांनी सोडला हिंसाचाराचा मार्ग; 313 लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ, आरोग्य तपासणी,
गडचिरोली/अहेरी, १७ सप्टेंबर २०२६ ::-
हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झालेल्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या पुनर्वसनाला अधिक बळ देण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘प्रोजेक्ट संजीवनी’ अंतर्गत भव्य जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. १५ सप्टेंबर रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालयात, तर १७ सप्टेंबर रोजी पोलीस उप-मुख्यालय (प्राणहिता), अहेरी येथे हा उपक्रम पार पडला.
या मेळाव्याच्या माध्यमातून सन २००५ पासून आत्मसमर्पण केलेल्या माओवादी सदस्यांच्या अडचणी व प्रलंबित समस्या जाणून घेण्यासोबतच त्यांना शासनाच्या विविध पुनर्वसन योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, कौशल्य विकास आणि उपलब्ध शासकीय सुविधांची माहिती देण्यात आली.
गडचिरोली पोलीस दलाच्या पुनर्वसन प्रयत्नांमुळे आतापर्यंत एकूण ८१९ माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पणानंतर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी प्रशासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यावर पोलिसांकडून भर दिला जात आहे.
३१३ लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ :-

गडचिरोली आणि प्राणहिता येथे आयोजित जनजागरण मेळाव्यांमध्ये आत्मसमर्पित माओवादी सदस्यांसाठी विविध शासकीय कागदपत्रे व योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला. यामध्ये आधार कार्ड, ई-श्रम कार्ड, महा सारथी कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड आणि आभा कार्ड यांचा समावेश आहे.

मेळाव्यादरम्यान एकूण ३१३ लाभार्थ्यांचे विविध शासकीय योजनांशी संबंधित दाखले व कार्ड काढून देण्यात आले. तसेच पुनर्वसन निधीच्या धनादेशांचेही वितरण करण्यात आले. यामुळे अनेक आत्मसमर्पित सदस्यांना शासकीय योजनांचा थेट लाभ घेणे सुलभ होणार आहे.
आरोग्य तपासणीसह विविध उपक्रम :-

आत्मसमर्पित सदस्यांच्या आरोग्याचीही विशेष काळजी घेण्यात आली. मेळाव्यादरम्यान तज्ज्ञ वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या माध्यमातून केवळ प्रशासकीय पुनर्वसन प्रक्रियेपुरते मर्यादित न राहता आत्मसमर्पित सदस्यांना नवीन ओळख, आत्मविश्वास, कौशल्य आणि सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

‘ऑपरेशन रोशनी’ अंतर्गत नेत्रोपचार शिबिरे, आवश्यक शस्त्रक्रिया, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन, सामाजिक समावेशन तसेच आत्मविश्वास वाढविण्यासाठी ध्यान व योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
४६ जोडप्यांचे सामूहिक विवाह; ९६ जणांना रोजगार :-

पुनर्वसनाच्या विविध उपक्रमांतर्गत आतापर्यंत ४६ आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचे सामूहिक विवाह घडवून आणण्यात आले आहेत. तसेच ९६ आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी यावेळी आत्मसमर्पित सदस्यांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करून आत्मनिर्भर बनावे, कुटुंबासोबत सुरक्षित व सुखी जीवन जगावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने पुढे जावे, असे आवाहन केले. आत्मसमर्पित सदस्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. हर्षवर्धन बी. जे., सहायक पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे, सहायक पोलीस अधीक्षक भामरागड श्री. सागर भामरे, सहायक पोलीस अधीक्षक धानोरा श्री. सुयश कुमार सिंग, पोलीस उपअधीक्षक (अभियान) श्री. सुनील उईके यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पिवाल, पोलीस उपनिरीक्षक विक्रम बुरंगे, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिक्षा राठोड तसेच पोलीस अंमलदारांनी मेळाव्याच्या आयोजनासाठी अथक परिश्रम घेतले.
