Friday, September 11, 2026
HomeAheriसुरजागड लोहखनिज वाहतुकीत स्थानिकांना डावलल्याचा आरोप; मुख्यमंत्र्यांकडे न्यायासाठी साकडे...

सुरजागड लोहखनिज वाहतुकीत स्थानिकांना डावलल्याचा आरोप; मुख्यमंत्र्यांकडे न्यायासाठी साकडे…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

आलापल्ली ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशनचा इशारा; मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा निर्धार,

गडचिरोली/अहेरी, 09 सप्टेंबर 2026::- सुरजागड लोहखनिज प्रकल्पातील वाहतूक व्यवस्थेत स्थानिक वाहतूकदारांना डावलून बाहेरील जिल्ह्यांतील व राज्यातील वाहतूकदारांना प्राधान्य दिले जात असल्याचा गंभीर आरोप आलापल्ली ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशनने केला आहे. या प्रकरणी असोसिएशनने राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत तातडीने हस्तक्षेप करून स्थानिकांना न्याय देण्याची मागणी केली आहे. मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

असोसिएशनच्या निवेदनानुसार, सुरजागड प्रकल्प सुरू होण्यापूर्वी स्थानिक बेरोजगारांना रोजगार व व्यवसायात प्राधान्य देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनावर विश्वास ठेवून अनेक स्थानिकांनी जमिनी व घरे गहाण ठेवून कर्ज काढत जड वाहने खरेदी केली. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात नक्षलवादी हल्ल्यात स्थानिकांची सुमारे ७० ते ८० वाहने जाळण्यात आली, असा दावा असोसिएशनने केला आहे. या नुकसानीनंतरही स्थानिक वाहतूकदारांनी प्रकल्पाला सहकार्य करत वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी योगदान दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

स्थानिकांवर नवनवीन अटी लादल्याचा आरोप :-

वाहतूक सुरळीत झाल्यानंतर लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि त्रिवेणी अर्थमुव्हर्स प्रा. लि. यांच्याकडून स्थानिक वाहतूकदारांवर विविध अटी लादल्या जात असल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. बाहेरील वाहतूकदारांना प्राधान्य दिले जात असून, स्थानिकांना सर्व गंतव्यस्थानांसाठी वाहतुकीचे आदेश न देता मध्यस्थांमार्फत कमिशनवर काम करण्यास भाग पाडले जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, स्थानिक ट्रान्सपोर्ट युनियनच्या वाहनांची कोणतीही पूर्वसूचना न देता संख्या कमी करण्यात आली असून, स्थानिकांची वाहने लोडिंगपासून दूर ठेवण्याची भूमिका घेतली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या आहेत प्रमुख मागण्या :-

आलापल्ली ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुढील मागण्या केल्या आहेत—

स्थानिक वाहनांवरील कपात तातडीने रद्द करून पूर्वीप्रमाणे वाहतूक सुरू करावी.

सर्व गंतव्यस्थानांसाठी स्थानिक वाहतूकदारांना लोडिंगमध्ये प्रथम प्राधान्य द्यावे.

स्थानिकांच्या नवीन वाहनांना वाहतुकीत प्राधान्याने सामावून घ्यावे.

स्थानिक मालवाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी कंपनीने जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.

बेरोजगार झालेल्या स्थानिक कामगारांना तातडीने पुन्हा कामावर घ्यावे.

शेकडो कुटुंबांवर उपासमारीची वेळ?

“स्थानिकांच्या रोजगारावर गदा आणल्यामुळे शेकडो वाहनमालक, चालक आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. सुरजागड प्रकल्पासाठी स्थानिकांनी मोठी गुंतवणूक करून वाहने घेतली आहेत. त्यामुळे त्यांच्या रोजगाराचा प्रश्न गांभीर्याने घेऊन मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा,” अशी मागणी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, आलापल्ली ट्रान्सपोर्ट वेल्फेअर असोसिएशनने केलेल्या या आरोपांवर लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही. कंपनीची बाजू जाणून घेऊन त्यांची अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular