VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
बालकांच्या आरोग्य, पोषण आणि पूर्वप्राथमिक शिक्षणातील योगदानाची दखल; भाजपातर्फे कृतज्ञता व्यक्त,
गडचिरोली /चामोर्शी,03 ऑक्टोबर 2026::- बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी तळागाळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या कार्याचा गौरव भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला. ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करून त्यांच्या सेवाभावी कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. भाजपा तालुकाध्यक्षा रोशनी वरघंटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
अंगणवाडी सेविका व मदतनीस या ग्रामीण तसेच शहरी भागातील बालकांच्या संगोपनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. बालकांना पोषण आहार उपलब्ध करून देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, पूर्वप्राथमिक शिक्षण देणे, तसेच पालकांना आरोग्य व पोषणाबाबत मार्गदर्शन करणे, अशी विविध जबाबदारी त्या सातत्याने पार पाडत आहेत.
बालकांच्या विकासाचा मजबूत पाया घडविण्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे असून, त्यांच्या निस्वार्थ सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाला विद्याताई आभारे, कविताताई किरमे, नरेश अलसावार, श्रावण सोनटक्के, नीरज रामानुजनवार, तृप्ती चिडंगे, सतीश भांडेकर, जयराम चलाख, भारत धोडरे, कौशल्य बुरांडे, मनीषा बोधनवार, कल्पना भांडेकर, भारती पटेल, चंदा मेश्राम यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीसांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आपल्या कार्याची समाजाकडून दखल घेतली जात असल्याची भावना यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आली.
