VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाहणी,
गडचिरोली /चामोर्शी, 02 ऑक्टोबर 2026::-पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चामोर्शी तालुक्यात कृषी विभागाची यंत्रणा शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचली असून, विविध गावांमध्ये शेतपिकांच्या स्थितीचे सर्वेक्षण व नुकसानीची पाहणी सुरू करण्यात आली आहे. तालुका कृषी अधिकारी वैभव उत्तरवार यांनी स्वतः शेतशिवारात जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी शेतातील पिकांची सद्यस्थिती, जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण, पिकांची वाढ तसेच पावसाअभावी जमिनीवर पडलेल्या भेगांची पाहणी करण्यात आली. कमी पावसामुळे पिकांवर झालेला परिणाम आणि भविष्यात होऊ शकणाऱ्या संभाव्य नुकसानीचा आढावा घेत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

पिकांचे नुकसान, शेतातील परिस्थिती आणि पीकस्थितीची नोंद घेण्यासोबतच आवश्यक त्या ठिकाणी पंचनाम्याची कार्यवाही करण्यात येत आहे. शासनाच्या दुष्काळी उपाययोजना व नुकसानभरपाईसाठी आवश्यक नोंदी वेळेत पूर्ण करण्यावर कृषी विभागाकडून भर दिला जात आहे.
यावेळी तालुका कृषी अधिकारी वैभव उत्तरवार यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करून शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पीकस्थितीची पाहणी करण्यासह नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी कृषी विभागाची यंत्रणा सक्रिय झाली आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने या सर्वेक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
