VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
४ ते ७ ऑक्टोबरदरम्यान सिरोंचा, अहेरी व भामरागडचा दौरा; नागरिक व कार्यकर्त्यांशी साधणार संवाद,
गडचिरोली, 03 ऑक्टोबर 2026::- राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम हे ४ ते ७ ऑक्टोबरदरम्यान सिरोंचा, अहेरी आणि भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर राहणार आहेत. या दौऱ्यात सिरोंचा येथे सलग दोन दिवस मुक्काम करून स्थानिक प्रश्नांचा आढावा घेण्यासोबतच ७ ऑक्टोबर रोजी भामरागड परिसरातील पूरस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.
डॉ. आत्राम हे २ ऑक्टोबर रोजी मुंबईहून विमानाने नागपूर येथे पोहोचणार असून, ३ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे मुक्काम करतील. त्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी सकाळी चंद्रपूर, बल्लारशाह, राजुरा, लकडकोट, मंचेरियाल व चेन्नूर मार्गे सिरोंचाकडे रवाना होतील. दुपारी सिरोंचा येथे पोहोचल्यानंतर ते तेथे मुक्काम करणार आहेत.
सिरोंच्यात दोन दिवस मुक्काम :-
५ ऑक्टोबर रोजीही डॉ. आत्राम यांचा सिरोंचा येथे मुक्काम राहणार आहे. या कालावधीत स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधून विविध समस्या व प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या सिरोंचा दौऱ्याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
यानंतर ६ ऑक्टोबर रोजी दुपारी सिरोंचाहून मंचेरियाल व कागजनगर मार्गे ते अहेरीकडे रवाना होतील. अहेरी येथील राजवाड्यात त्यांचा मुक्काम राहणार आहे.
भामरागडमधील पूरस्थितीची पाहणी :-
दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी डॉ. आत्राम भामरागडकडे रवाना होतील. तेथील पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, नुकसानीची परिस्थिती तसेच स्थानिक पातळीवरील समस्यांचा आढावा घेणार आहेत. पाहणीनंतर ते अहेरीला परतणार आहेत.
डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या या दौऱ्यामुळे सिरोंचा, अहेरी आणि भामरागड परिसरातील स्थानिक प्रश्नांना प्रशासनिक व राजकीय पातळीवर पुन्हा महत्त्व मिळण्याची शक्यता आहे.
