VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्यासाठी दोन लाखांची मदत; कायद्याच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशपूर्व प्रशिक्षण देण्याचा संकल्प,
गडचिरोली /चामोर्शी, 02 ऑक्टोबर 2026::-यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी येथील प्राचार्य शाम रामटेके यांच्या ३१ वर्षांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेला सन्मानपूर्ण निरोप देण्यात आला. विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला त्यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. यावेळी त्यांच्या पत्नी अरुणा रामटेके यांच्यासह त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
शिक्षक ते प्राचार्य असा प्रदीर्घ प्रवास पूर्ण करताना शाम रामटेके यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासालाही विशेष महत्त्व दिले. मनमिळावू आणि आपुलकीच्या स्वभावामुळे त्यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच समाजातील विविध घटकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. विद्यालयाच्या शैक्षणिक व प्रशासकीय वाटचालीत त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले. शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकी जपली.

सेवानिवृत्ती सत्काराला उत्तर देताना रामटेके यांनी आपल्या ३१ वर्षांच्या सेवाकाळातील अनेक आठवणींना उजाळा दिला. विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी त्यांनी घेतलेला सामाजिक बांधिलकीचा महत्त्वपूर्ण निर्णय उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून गेला. सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या रकमेतून दोन लाख रुपये सामाजिक कार्यासाठी देण्याची घोषणा त्यांनी केली. या निधीतून कायद्याचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेशपूर्व प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना कायद्याच्या उच्च शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सोहळ्यात शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करून रामटेके यांच्या सहवासातील आठवणी सांगितल्या. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा, विद्यार्थ्यांप्रती असलेल्या तळमळीचा तसेच सामाजिक योगदानाचा गौरव केला.
सहकाऱ्यांनी दिला जिव्हाळ्याचा निरोप :-

कार्यक्रमाच्या समारोपानंतर विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रामटेके यांना अत्यंत सन्मानपूर्वक निरोप देत त्यांच्या निवासस्थानापर्यंत सोबत केली. ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सहकाऱ्यांनी दिलेल्या या जिव्हाळ्याच्या निरोपामुळे वातावरण भावूक झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याची सांगता हृदयस्पर्शी वातावरणात झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे नवनियुक्त प्राचार्य राजू धोडरे होते. प्रमुख अतिथी म्हणून राहुल लोकविकास मंडळाचे सचिव विवेकजी सहारे, कोषाध्यक्ष वकटुजी उंदीरवाडे, प्रशासकीय अधिकारी विनोद हाटकर, ॲड. बोधी रामटेके, प्रा. प्रेमानंद वालदे, रेवनदासजी उंदीरवाडे तसेच इतिहास मेश्राम यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी रामटेके यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण गव्हारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन जयश्री कोठारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण नैताम, गुरु सातपुते, लोकनाथ दूधबळे, निलेश क्षिरसागर, अमोल उंदिरवाडे, प्रा. प्रदीप भांडेकर, दिपाली घोंगडे, सचिन पिपरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी लक्ष्मण गव्हारे, माणिक चंद्रागडे, अनिल बोरुले, आनंद रामटेके, आशाताई उंदीरवाडे आणि करुणा रामटेके यांनी विशेष सहकार्य केले.
