Wednesday, October 7, 2026
HomeRegadiआंघोळीसाठी जात असताना सर्पदंश; एसआरपीएफ जवानाचा मृत्यू...

आंघोळीसाठी जात असताना सर्पदंश; एसआरपीएफ जवानाचा मृत्यू…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

रेगडी येथे कर्तव्यावर असलेल्या धुळे जिल्ह्यातील राहुल शिंगाडे यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी अंत; स्वतः सर्पमित्र असल्याची माहिती,

गडचिरोली/रेगडी,07 ओक्टोबर 2026::-रेगडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत कर्तव्यावर असलेल्या एसआरपीएफ जवानाचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. राहुल प्रभाकर शिंगाडे (वय ३५) असे मृत जवानाचे नाव असून ते एसआरपीएफ ग्रुप क्रमांक ६ मध्ये कार्यरत होते. ते मूळचे धुळे जिल्ह्यातील रहिवासी होते. विशेष म्हणजे राहुल शिंगाडे हे स्वतः सर्पमित्र म्हणूनही कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास राहुल शिंगाडे हे कर्तव्यावर असताना आंघोळीसाठी जात होते. याच वेळी त्यांना सापाने दंश केला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने चामोर्शी येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. दुपारी सुमारे १.१५ वाजता त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच गंभीर होत गेली.

प्रकृती चिंताजनक झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांना गडचिरोलीकडे रवाना करण्यात आले. मात्र गडचिरोली येथे पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी सुमारे ३ वाजता त्यांना गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

यानंतर पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. गडचिरोली सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राहुल शिंगाडे यांचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी धुळे जिल्ह्यात रवाना करण्यात आला.

स्वतः सर्पमित्र असतानाही सर्पदंशाने घेतला जीव:-

राहुल शिंगाडे यांना सापांविषयी चांगली माहिती होती आणि ते सर्पमित्र म्हणूनही कार्यरत असल्याची माहिती आहे. सर्पमित्र म्हणून काम करणाऱ्या आणि सापांबाबत जाणकार असलेल्या जवानाचा सर्पदंशामुळेच मृत्यू झाल्याने या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, शिंगाडे यांना सर्पदंश नेमका कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या परिस्थितीत झाला, तसेच सापाचा प्रकार कोणता होता, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे घटनेची नेमकी पार्श्वभूमी तपासानंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

घटनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी रेगडी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अतिरिक्त पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी फोन न उचलल्याने त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

कर्तव्य बजावत असलेल्या एसआरपीएफ जवानाचा सर्पदंशामुळे झालेला मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेची नेमकी परिस्थिती, सर्पदंशाचे ठिकाण आणि जवानाला मिळालेल्या वैद्यकीय उपचारांची साखळी याबाबत संबंधित यंत्रणेकडून अधिकृत माहिती स्पष्ट होणे अपेक्षित आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular