Wednesday, October 7, 2026
HomeGadchiroliगडचिरोलीत ३५ बालकांना नवजीवन; ‘सेवा संकल्प’अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया यशस्वी..

गडचिरोलीत ३५ बालकांना नवजीवन; ‘सेवा संकल्प’अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया यशस्वी..

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

DEIC आणि RBSKचा संयुक्त उपक्रम; नागपूरच्या तज्ज्ञ बाल शल्यचिकित्सकांचे मोलाचे योगदान,

गडचिरोली, 07 ऑक्टोबर 2026::-

ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू बालकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत दोन दिवसीय मोफत बाल शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल ३५ बालकांवर यशस्वीपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे ३ व ४ ऑक्टोबर २०२६ रोजी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या पहिल्या दिवशी २१, तर दुसऱ्या दिवशी १४ बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये हर्निया, हायड्रोसील, फायमोसीस, सिस्ट आदी आजारांनी ग्रस्त बालकांचा समावेश होता. गरजू कुटुंबांवरील आर्थिक भार कमी व्हावा, यासाठी या सर्व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या.

नागपूरच्या तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष उपस्थित :-

या शिबिरासाठी इंडियन असोसिएशन ऑफ पेडियाट्रिक सर्जन्स (IAPS), नागपूर शाखेचे वरिष्ठ बाल शल्यचिकित्सक डॉ. दीपक गोयल तसेच बाल शल्यचिकित्सक डॉ. मयूर सोनी यांनी विशेष योगदान दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांच्या आवश्यक तपासण्या करून पात्र रुग्णांच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या.

शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी गडचिरोली सामान्य रुग्णालयातील शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ, शस्त्रक्रियागृह प्रमुख, ओटी कर्मचारी तसेच परिचारकांच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

RBSKच्या तपासणीतून रुग्णांची निवड:-

जिल्ह्यातील विविध भागांत RBSK पथकांमार्फत प्राथमिक आरोग्य तपासणीदरम्यान संदर्भित करण्यात आलेली बालके तसेच DEIC केंद्रात नोंदणीकृत बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर शस्त्रक्रियेसाठी पात्र बालकांची निवड करून त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यात आले.

ग्रामीण आणि दुर्गम भागातील बालकांमध्ये आढळणाऱ्या आजारांचे वेळीच निदान होऊन त्यांना गुणवत्तापूर्ण उपचार मिळावेत, यासाठी DEIC व RBSKच्या माध्यमातून सातत्याने विविध आरोग्य उपक्रम राबविले जात आहेत. ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत झालेल्या या शस्त्रक्रियांमुळे जिल्ह्यातील अनेक गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांनी माहिती दिली.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular