VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
एटापल्ली, दि. ६ ऑक्टोबर २०२६ : एटापल्ली तालुक्यात यावर्षी अनियमित पाऊस, पावसातील खंड, अतिवृष्टी, पीक रोगराई व कीड प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे नुकसान होत असून तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यासाठी तातडीने वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) व ऑल इंडिया किसान सभा (AIKS) यांच्या वतीने करण्यात आली.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तहसीलदार, एटापल्ली यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. एटापल्ली तालुका हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. यावर्षी अनेक गावांमध्ये पावसाचे प्रमाण अनियमित राहिले असून काही ठिकाणी अतिवृष्टी, तर काही भागात पावसाचा दीर्घ खंड पडल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. त्यातच भात व इतर खरीप पिकांवर रोगराई आणि कीड प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रशासनाने केवळ पर्जन्यमानाच्या आकडेवारीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शेतपिकांची स्थिती, पावसातील खंड, पीक नुकसान, जमिनीतील ओलावा, रोगराई, कीड प्रादुर्भाव आणि उत्पादनातील घट या सर्व बाबींचा विचार करून गावनिहाय सर्वेक्षण करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

कृषी व महसूल विभागामार्फत संयुक्त पीक परिस्थिती सर्वेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार आर्थिक मदत व पीक नुकसानभरपाई द्यावी, पात्र शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळवून द्यावा तसेच आवश्यक बियाणे, खते व रोगनियंत्रणासाठी कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुष्काळ मूल्यांकनासाठी लागू असलेल्या शासनाच्या निकषांनुसार एटापल्ली तालुक्याची तपासणी करून पात्रतेनुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यासाठी शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा. तसेच सर्वेक्षणाचा अहवाल व शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाची माहिती सार्वजनिक करावी, अशीही मागणी करण्यात आली.
कॉम्रेड सचिन मोतकुरवार म्हणाले : “एटापल्ली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि शासनाच्या निकषांनुसार तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व पीकविम्याचा लाभ मिळवून द्यावा. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास CPI व AIKSच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.”
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव व AIYF महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड सचिन मोतकुरवार, कॉम्रेड सुरज जककुलवार, कॉम्रेड रितेश जोई, देवराम नरोटे, परशुराम नैताम, दशरथ पोटावी, मनकु मटामी यांच्यासह CPI कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीची तातडीने दखल घेऊन सर्वेक्षण व पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी CPI व ऑल इंडिया किसान सभेच्या वतीने करण्यात आली आहे.
