Friday, October 9, 2026
HomeChamorshiचिचडोह बॅरेज पुलावर मध्यरात्री मगरीचा थरार; वन विभागाने घेतली धाव...

चिचडोह बॅरेज पुलावर मध्यरात्री मगरीचा थरार; वन विभागाने घेतली धाव…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

वैनगंगा नदीतून थेट पुलावर आली मगर; सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस, नागरिक व मच्छीमारांना सावध राहण्याचे आवाहन

चामोर्शी, 09 ऑक्टोबर 2026::-

चामोर्शी शहराजवळील वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेज पुलावर गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास मगर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. नदीपात्रातून थेट पुलावर आलेल्या मगरीला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मगरीला सुरक्षितपणे पुन्हा नदीपात्रात हाकलून लावले. सुदैवाने या घटनेत कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

कुत्र्यांच्या भुंकण्याने मगरीच्या वावराची माहिती :-

चिचडोह बॅरेज पुलावरील रस्ता सकाळपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुला असतो. त्यानंतर चामोर्शी आणि लोंढोली या दोन्ही बाजूंची प्रवेशद्वारे बंद केली जातात. पुलाच्या दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन सुरक्षा रक्षक तैनात असतात.

गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वैनगंगा नदीतून एक मगर पुलावर आली. यावेळी पुलावरील कुत्रे जोरजोरात भुंकू लागल्याने सुरक्षा रक्षकांचे लक्ष त्या दिशेने गेले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सुरक्षा रक्षक लिखित धोडरे यांनी घोट पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विकास दूधबावरे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

वन विभागाची तत्काळ कारवाई :-

शाखा अभियंता विकास दूधबावरे यांनी चामोर्शी वन विभागाचे क्षेत्रसहाय्यक सलीम कुरेशी यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तलोधी येथील वनरक्षक प्रमोद धाडसे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

वनरक्षक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा मगर पुलावरच होती. तिला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी जमली होती. वन विभागाच्या पथकाने परिस्थिती हाताळत मगरीला सुरक्षितपणे वैनगंगा नदीच्या पात्रात हाकलून लावले. यानंतर नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

नदीकाठी वावरणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी :-

चिचडोह बॅरेज पुलावर मगर आढळल्याच्या घटनेमुळे वैनगंगा नदी परिसरात वावरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नदीपात्रात उतरणाऱ्या नागरिकांनी, मच्छीमारांनी तसेच नदीकाठी जाणाऱ्या व्यक्तींनी विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. पाण्यात उतरताना कोणताही धोका पत्करू नये आणि मगर दिसल्यास तिच्याजवळ जाण्याचा किंवा तिला त्रास देण्याचा प्रयत्न न करता संबंधित वन विभागाला तातडीने माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

— विकास दूधबावरे, शाखाधिकारी, पाटबंधारे विभाग, घोट

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular