VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
शेतकरी कामगार पक्षाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी,
पीक नुकसान भरपाईसह विविध सवलती देण्याची मागणी,
गडचिरोली /मुलचेरा, 09 ऑक्टोबर 2026::-चालू खरीप हंगामात पावसाचे प्रमाण समाधानकारक नसल्याने तालुक्यातील शेती संकटात सापडली असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणींचे सावट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुलचेरा तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसह विविध शासकीय सवलतींचा लाभ द्यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या मुलचेरा तालुका समितीने मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे मुलचेरा तालुका चिटणीस भाई चिरंजीव पेंदाम यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. मुलचेरा तालुका हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून, येथील बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. शेती आणि शेतीपूरक व्यवसाय हेच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्याने प्रतिकूल पावसाचा त्यांच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
वस्तुनिष्ठ पंचनामे करून दुष्काळ जाहीर करा :-
तालुक्यातील पर्जन्यमान, पेरणीक्षेत्र, पीक परिस्थिती, नुकसान, उपलब्ध पाणीसाठा, भूजलपातळी आणि पीक उत्पादकता या निकषांवर संबंधित शासकीय यंत्रणेमार्फत तातडीने सर्वंकष पाहणी व वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत. परिस्थितीचा आढावा घेऊन तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि पात्र शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई, कृषी निविष्ठांसाठी मदत, कर्जविषयक सवलती तसेच महसूल व वीजबिलांबाबत नियमानुसार सवलती द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
पिण्याचे पाणी, चारा आणि वीजपुरवठ्याचा प्रश्न सोडवा :-
दुष्काळसदृश परिस्थितीमुळे नागरिकांसह पशुधनालाही पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची आणि पशुधनासाठी पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी. शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवून वीजबिलात नियमानुसार सवलत द्यावी. तसेच पीककर्ज आणि इतर कृषी कर्जांबाबत शासनाच्या दुष्काळी उपाययोजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत तातडीने पोहोचवावा, अशीही मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.
कार्यकर्त्यांची उपस्थिती :-
निवेदन सादर करताना शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस भाई चिरंजीव पेंदाम यांच्यासह जगन्नाथ आत्राम, रविन मंडल, साईनाथ उरेते, दामा कडते, सुधाकर घोडाम, मिथुन कुळमेथे, अरुण कन्नाके, बालाजी सिडाम, भैय्याजी नैताम, अनिल गावडे, आनंदराव आत्राम, भास्कर सेडमाके, सुरेश कुळमेथे, रविंद्र तोरे, भास्कर राऊत, भास्कर मडावी, मंगामी आलाम, शंकर मडावी, शिवराम कुसनाके, रामदास कठबाळे, किशन कुमरे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
