Saturday, October 10, 2026
HomeEtapalliCPI च्या पाठपुराव्याला यश; गुरूपल्लीतील पाच महिन्यांपासून बंद हातपंप सुरू...

CPI च्या पाठपुराव्याला यश; गुरूपल्लीतील पाच महिन्यांपासून बंद हातपंप सुरू…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

एटापल्लीतील गुरूपल्ली गावातील १० कुटुंबांना दिलासा; पिण्याच्या पाण्यासाठीची पायपीट थांबली,

एटापल्ली, 10 ऑक्टोबर 2026::- गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या हातपंपाच्या दुरुस्तीसाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) च्या वतीने करण्यात आलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. ग्रामपंचायत गुरूपल्ली अंतर्गत येणाऱ्या गुरूपल्ली गावात श्री. प्रकाश इष्टाम यांच्या घरासमोरील बंद हातपंपाची दुरुस्ती करण्यात आल्याने गावातील सुमारे १० कुटुंबांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

पाण्यासाठी महिलांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडण्याची वेळ :-

गुरूपल्ली गावातील संबंधित हातपंप गेल्या पाच महिन्यांपासून बंद असल्याने परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर जावे लागत होते. विशेषतः महिला, तरुणी आणि लहान मुलांना पाणी आणण्यासाठी मुख्य डांबरी रस्ता ओलांडावा लागत होता. या मार्गावर ट्रकसह अन्य वाहनांची सतत वर्दळ असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेअभावी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

CPI च्या निवेदनानंतर प्रशासनाकडून दखल :-

या समस्येने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडे मदतीची मागणी केली. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन CPI, गडचिरोली जिल्हा समितीच्या वतीने पंचायत समिती एटापल्लीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. बंद हातपंपाची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

CPI च्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर हातपंपाची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे पाच महिन्यांपासून प्रलंबित असलेला पाण्याचा प्रश्न सुटून सुमारे १० कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

‘मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना महिनेन्‌महिने प्रतीक्षा का?’:-

यावेळी CPI चे जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार म्हणाले, “पिण्याचे पाणी ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज आहे. मात्र, हातपंप बंद असल्याने नागरिकांना पाच महिने त्रास सहन करावा लागणे ही गंभीर बाब आहे. गुरूपल्लीतील नागरिकांनी आपली समस्या आमच्याकडे मांडल्यानंतर आम्ही प्रशासनाकडे निवेदन देऊन पाठपुरावा केला. त्यानंतर हातपंप सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.”

पुढे बोलताना त्यांनी नागरिकांना आपल्या हक्कांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. गावातील पाणी, रस्ते, वीज, आरोग्य आणि अन्य मूलभूत सुविधांशी संबंधित समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी संघटितपणे पुढे यावे. अशा प्रश्नांवर प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टी नागरिकांच्या पाठीशी उभी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सार्वजनिक सुविधांच्या नियमित देखभालीची मागणी :-

ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी संबंधित प्रशासनाने सार्वजनिक सुविधांची नियमित देखभाल करावी. तसेच नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यांचे वेळेत निराकरण करावे, अशी मागणी CPI च्या वतीने करण्यात आली.

या कामासाठी CPI चे जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य कॉम्रेड सुरज जक्कुलवार, विलास मट्टामी तसेच गुरूपल्ली गावातील नागरिकांनी पुढाकार घेतला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular