VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
वालसरा येथे अंत्यविधीस उपस्थित राहून भांडेकर कुटुंबीयांचे केले सांत्वन; प्रा. रमेश बारसागडे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती,
गडचिरोली/चामोर्शी, 10 ऑक्टोबर 2026::-चामोर्शी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा भाजपचे ज्येष्ठ नेते केशवजी भांडेकर यांच्या निधनाने वलसारा परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्वगावी वलसारा येथे पार पडलेल्या अंत्यविधीस भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा गडचिरोलीचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी डॉ. देवराव होळी यांनी भांडेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. केशवजी भांडेकर यांच्या निधनाने भाजपने एक निष्ठावान कार्यकर्ता, अनुभवी नेतृत्व आणि सामाजिक कार्यात योगदान देणारे व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत, त्यांच्या आठवणी सदैव प्रेरणादायी राहतील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
या दुःखद प्रसंगी शोकाकुल भांडेकर परिवाराला दुःख सहन करण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी केशवजी भांडेकर यांना श्रद्धांजली अर्पण करून भांडेकर परिवाराप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या.
