Saturday, October 10, 2026
HomeAshtiआष्टी पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूसाठ्यासह १०.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त...

आष्टी पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारूसाठ्यासह १०.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

नाकाबंदीदरम्यान टाटा इंट्रा पिकअपमधून देशी-विदेशी दारूचा मोठा साठा जप्त; अंधाराचा फायदा घेत वाहनचालक फरार,

गडचिरोली /आष्टी, 10 ऑक्टोबर 2026::-गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरीत्या दारूची विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गडचिरोली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आष्टी पोलीस स्टेशनच्या पथकाने नाकाबंदीदरम्यान अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या टाटा इंट्रा पिकअप वाहनातून देशी-विदेशी दारूसाठ्यासह एकूण १० लाख ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा करताच चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून अंधाराचा फायदा घेत शेतशिवारातून पळ काढला. फरार चालकाचा शोध सुरू आहे.

गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि वाहतुकीविरुद्ध प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी दिले आहेत. त्यानुसार ९ ऑक्टोबर रोजी आष्टी पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत येणापूर ते चामोर्शी मार्गावरून चारचाकी पिकअप वाहनातून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वाखाली आष्टी पोलिसांच्या पथकाने मौजा अडपल्ली परिसरात वाहनांची तपासणी करण्यासाठी नाकाबंदी लावली. दरम्यान, येणापूरकडून येणारे एमएच ३४ बीझेड २९८२ क्रमांकाचे टाटा इंट्रा पिकअप वाहन पोलिसांना संशयास्पद आढळले. पथकाने वाहन थांबविण्याचा इशारा दिला असता चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले आणि अंधार व शेतशिवाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.

वाहनातून ५.५९ लाखांची दारू जप्त :-

पोलिसांनी पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशी-विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ९० मिलीच्या रॉकेट देशी दारूच्या ३,९०० निपा, किंमत ३ लाख १२ हजार रुपये; १८० मिलीच्या रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ४८० निपा, किंमत १ लाख ९२ हजार रुपये; ५०० मिलीच्या हेवर्ड्स ५००० बिअरचे १२० कॅन, किंमत ३६ हजार रुपये; तसेच १८० मिलीच्या ऑल सीझन्स व्हिस्कीच्या ४८ निपा, किंमत १९ हजार २०० रुपये यांचा समावेश आहे.

या सर्व दारूसाठ्याची एकूण किंमत ५ लाख ५९ हजार २०० रुपये असून, दारूच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या टाटा इंट्रा पिकअप वाहनाची अंदाजे किंमत ५ लाख रुपये आहे. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण १० लाख ५९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

फरार चालकाचा शोध सुरू :-

या प्रकरणी आष्टी पोलीस स्टेशनमध्ये अप. क्र. ०३०३/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (अ) अंतर्गत फरार वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध सुरू असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई :-

पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक गडचिरोली गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

आष्टी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार प्रकाश सिडाम, पोलीस अंमलदार वैभव हेडाऊ आणि पोलीस अंमलदार सुभाष वाकडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular