Friday, September 18, 2026
HomeAshtiआष्टीत पंदीलवार कुटुंबीयांकडून २० वर्षांपासून महालक्ष्मी पूजनाची परंपरा अखंडित...

आष्टीत पंदीलवार कुटुंबीयांकडून २० वर्षांपासून महालक्ष्मी पूजनाची परंपरा अखंडित…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

धार्मिक उत्सवातून सामाजिक एकोपा आणि बांधिलकीचा संदेश,

आज विविध धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन,

गडचिरोली /आष्टी, 18 सप्टेंबर 2026::-धार्मिक श्रद्धा, परंपरेचे जतन आणि सामाजिक एकोप्याची भावना जपत आष्टी येथील पंदीलवार कुटुंबीयांनी गेल्या २० वर्षांपासून महालक्ष्मी पूजनाची परंपरा अखंडितपणे सुरू ठेवली आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रुपाली पंदीलवार आणि सामाजिक कार्यकर्ते संजय पंदीलवार यांच्या आष्टी येथील निवासस्थानी दरवर्षी भक्तिभावाने महालक्ष्मी पूजन उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक वारसा जपण्यासोबतच समाजातील सर्व घटकांमध्ये आपुलकी, एकोपा आणि सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पंदीलवार कुटुंबीयांच्या निवासस्थानी आयोजित महालक्ष्मी पूजन उत्सव दोन दिवसांचा असतो. गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी विधिवत देवीची स्थापना करण्यात आली. यानिमित्ताने देवीच्या पूजास्थळाची आकर्षक सजावट करण्यात आली असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला आहे.

शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून महालक्ष्मी पूजनाच्या विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली. घटस्थापना, विधिवत पूजन, सुहासिनींकडून देवीची ओटी भरणे आणि आरती अशा धार्मिक कार्यक्रमांतून महालक्ष्मीचा जयघोष करण्यात येत आहे. श्रद्धा आणि भक्तिभावाने साजऱ्या होणाऱ्या या उत्सवामुळे परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

परिसरातील भाविकांची उत्सवाला उपस्थिती :-

पंदीलवार कुटुंबीयांच्या महालक्ष्मी पूजन उत्सवाला दरवर्षी परिसरातील विविध गावांमधून भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होतात. अनखोडा, मार्कंडा (कं), इल्लूर, आष्टी, कुनघाडा, ठाकरी, चौडमपली, चपराळा, चंदनखेडी आणि रामपूर आदी गावांतील भाविक या उत्सवात उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतात. त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक सोहळा न राहता परिसरातील नागरिकांना एकत्र आणणारा श्रद्धा आणि आपुलकीचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.

आज धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन :-

महालक्ष्मी पूजन उत्सवानिमित्त शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धार्मिक विधींची सांगता झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने जपली जात असून, उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक संस्कृतीचे संवर्धन आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला जात आहे.

या महालक्ष्मी पूजन उत्सवात परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देवीचे दर्शन घ्यावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रुपाली पंदीलवार, सामाजिक कार्यकर्ते संजय पंदीलवार, मधुकर पंदीलवार आणि आयुष पंदीलवार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular