Tuesday, October 13, 2026
HomeChamorshiचामोर्शीत शेतकऱ्यांचा वीजप्रश्नावर संतापाचा उद्रेक; चक्काजामने प्रशासनाला घाम फुटला...

चामोर्शीत शेतकऱ्यांचा वीजप्रश्नावर संतापाचा उद्रेक; चक्काजामने प्रशासनाला घाम फुटला…

VAINGANGA NEWS 24/विशेष प्रतिनिधी,

 २४ तास वीजपुरवठ्याची मागणी; अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा,

दोन दिवसांत १२ तास वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा १६ ऑक्टोबरला उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक; हजारो शेतकरी-महिलांचा आंदोलनात सहभाग,

गडचिरोली /चामोर्शी, 13 ऑक्टोबर 2026::- पावसाची दडी, महावितरणचे वाढते भारनियमन आणि करपण्याच्या मार्गावर असलेले भातपीक… या संकटांनी त्रस्त झालेल्या चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचा अखेर संतापाचा बांध फुटला! शेतीसाठी पुरेशी वीज मिळत नसल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाचवायचे कसे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर १३ ऑक्टोबर रोजी चामोर्शी बसस्थानक चौकात शेतकरी आणि महिलांनी एकत्र येत जोरदार चक्काजाम आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून महावितरण आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा द्या, लोडशेडिंग बंद करा आणि पिके वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, अशी आक्रमक मागणी आंदोलकांनी केली. प्रशासनाला दोन दिवसांची मुदत देत, मागण्या पूर्ण न झाल्यास १६ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर भव्य ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

 अवघे ३ ते ४ तास वीज; भातशेती संकटात:-

चामोर्शी तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतीसमोर पाणीटंचाईचे मोठे संकट उभे ठाकले आहे. भातपिकांसह इतर पिकांना वाचविण्यासाठी कृषीपंपांद्वारे सिंचन करणे गरजेचे असताना महावितरणच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी आठ तास असलेले भारनियमन वाढवून १२ तास करण्यात आले आहे. त्यातच शेती आणि गावांचे फीडर वेगळे करण्याच्या कामामुळे वीजपुरवठ्यात आणखी व्यत्यय येत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना प्रत्यक्षात अवघे तीन ते चार तासच वीज मिळत असल्याची तक्रार करण्यात आली.

बँकांकडून कर्ज घेऊन, उसनवारी करून आणि दिवसरात्र मेहनत करून उभे केलेले पीक आता पाण्याअभावी धोक्यात आले आहे. उत्पादन हातातून गेले, तर कर्जाची परतफेड कशी करायची आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यामुळे केवळ आश्वासनांऐवजी तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली.

 लोडशेडिंगमुक्त जिल्ह्यात शेतकऱ्यांवर अन्याय का?:-

दिवंगत आर. आर. पाटील पालकमंत्री असताना गडचिरोली जिल्हा लोडशेडिंगमुक्त ठेवण्यात आला होता, अशी आठवण आंदोलकांनी करून दिली. मग आज याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भारनियमनाचा सामना का करावा लागत आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

फीडर विभक्तीकरणाचे काम महत्त्वाचे असले, तरी त्याचा फटका शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना बसता कामा नये, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. हे काम महिनाभर थांबवून शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

 अधिकाऱ्यांची धाव; १२ तास वीजपुरवठ्याचे आश्वासन :-

चक्काजाम आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन तहसीलदार प्रशांत घोरुडे, महावितरणचे उपविभागीय अभियंता रमाकांत देवगडे आणि पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यात आले.

महावितरणचे उपविभागीय अभियंता रमाकांत देवगडे यांनी कृषीपंपांसाठी तातडीने १२ तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याबाबत आश्वासन दिले. तसेच शेतीसाठी २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल, असे स्पष्ट केले.

मात्र, शेतकऱ्यांची मुख्य मागणी असलेल्या २४ तास वीजपुरवठ्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली आहे.

 दोन दिवसांची मुदत; १६ ऑक्टोबरला ठिय्या आंदोलनाचा इशारा :-

महावितरणने दिलेल्या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी आंदोलकांनी प्रशासनाला दोन दिवसांची मुदत दिली आहे. या कालावधीत कृषीपंपांसाठी सुरळीत १२ तास वीजपुरवठा सुरू झाला नाही, तर १६ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी (महसूल) कार्यालयासमोर भव्य ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अतुल गण्यारपवार यांनी दिला.

शेतकऱ्यांच्या पिकांचा प्रश्न हा त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेऊ नये, तर प्रत्यक्षात वीजपुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

 चक्काजाममध्येही माणुसकीचे दर्शन :-

आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. चक्काजाममुळे बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आंदोलनकर्त्यांनी चिवडा आणि पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी प्रवाशांप्रति दाखविलेल्या या माणुसकीचेही लक्ष वेधले गेले.

 हजारो शेतकरी-महिलांचा सहभाग :-

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, उपसभापती प्रेमानंद मल्लिक, सुरेश परसोडे, सुधाकर गदे, करण गण्यारपवार, नाना गण्यारपवार, मधुकर चिंतलवार, राजू आत्राम, गोसाई सातपुते, सुधाकर निखाडे, शामराव पोरटे, पंचरंग मडल, जुगल बारई, रमेश भसारकर, विनोद शेंगर, पंकज दहेलकर, गुरुदास चौधरी, खोजेंद्र सातपुते, सुनील आभारे यांच्यासह तालुक्यातील हजारो महिला व पुरुष शेतकरी सहभागी झाले होते.

आता सर्वांचे लक्ष १६ ऑक्टोबरकडे! महावितरण शेतकऱ्यांच्या मागण्यांची वेळेत अंमलबजावणी करणार की शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भातपीक वाचविण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले असून, प्रशासनाच्या पुढील निर्णयावर चामोर्शीतील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular