VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस; 3 लाख ४५ हजारसह मुद्देमाल जप्त,चार बैल गोशाळेत रवाना,
गडचिरोली /चामोर्शी, 12 ऑक्टोबर 2026::-चामोर्शी येथून लखमापूर-बोरीच्या दिशेने चार बैलांची वाहतूक करणारे वाहन गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे अडविण्यात आले. ही घटना काल रात्री लखमापूर-बोरी येथे घडली. गावकऱ्यांनी वाहन अडविल्याचे लक्षात येताच चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहन ताब्यात घेतले. वाहनातील चार बैलांची अंदाजे किंमत ४५ हजार रुपये असून, त्यांना चामोर्शी येथील गोशाळेत पाठविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
एका इसमाला कट मारल्याने प्रकार उघडकीस :-
मिळालेल्या माहितीनुसार, MH34TCQ2316 क्रमांकाच्या वाहनातून चार बैल घेऊन चामोर्शी येथून लखमापूर-बोरीच्या दिशेने वाहतूक केली जात होती. दरम्यान, लखमापूर-बोरी येथे या वाहनाने एका इसमाला कट मारल्याची माहिती समोर आली. त्यानंतर वाहन पुढे जात असताना गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत ते अडविले. मात्र, नागरिकांची सतर्कता लक्षात येताच चालकाने वाहन सोडून पळ काढला. या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहन ताब्यात घेतले.
बैल गौशाळेत रवाना –
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वाहनातून चार बैल आढळून आले. या चारही बैलांची अंदाजे किंमत ४५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी बैलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने चामोर्शी येथील गोशाळेत रवाना केले आहे. मात्र, या जनावरांची वाहतूक कोणत्या उद्देशाने केली जात होती, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
वाहतुकीमागील नेमके कारण काय?:-
चार बैलांची वाहतूक नेमकी कुठून आणि कोणत्या ठिकाणी केली जात होती, तसेच त्यासाठी आवश्यक कागदपत्रे होती की नाहीत, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. जनावरे कत्तलीसाठी नेली जात असावीत, असा संशय व्यक्त केला जात असला, तरी त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे जनावरांच्या मालकीची माहिती, वाहतुकीचा उद्देश आणि संबंधित कागदपत्रांची वैधता तपासल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.
चालकाचा शोध सुरू; पोलीस तपासाकडे लक्ष :-
पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हिना देशमुख या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. घटनास्थळावरून फरार झालेल्या चालकाचा शोध घेणे, वाहनाच्या मालकाची माहिती मिळविणे आणि बैलांच्या वाहतुकीमागील नेमके कारण शोधणे, या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.
गावकऱ्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असला, तरी बैलांची वाहतूक कोणत्या कारणासाठी केली जात होती, याचे उत्तर आता पोलीस तपासातूनच मिळणार आहे.
