Monday, October 12, 2026
HomeChamorshiचामोर्शी पोलिसांची सायबर गुन्ह्यांविरोधात धडक मोहीम; MRM पोर्टलद्वारे फसवणुकीची रक्कम परत मिळवण्याबाबत...

चामोर्शी पोलिसांची सायबर गुन्ह्यांविरोधात धडक मोहीम; MRM पोर्टलद्वारे फसवणुकीची रक्कम परत मिळवण्याबाबत मार्गदर्शन…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

ऑनलाईन फसवणूक टाळण्यापासून चोरीचा मोबाईल शोधण्यापर्यंत जनजागृती; विद्यार्थ्यांनाही सायबर सुरक्षेचे धडे,

गडचिरोली /चामोर्शी, 12 ऑक्टोबर 2026::- दिवसेंदिवस वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांना ऑनलाईन फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी चामोर्शी पोलिसांनी सायबर जनजागृती मोहिमेला गती दिली आहे. सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन चामोर्शी येथे सायबर जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी नव्याने सुरू करण्यात आलेल्या MRM (Money Recovery Management) पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीतील रक्कम परत मिळविण्याच्या प्रक्रियेबाबत पोलीस अधिकारी व अंमलदारांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांनी पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित अधिकारी व अंमलदारांना MRM पोर्टलची कार्यपद्धती समजावून सांगितली. ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यानंतर संबंधित रक्कम गोठविण्याची (Freeze) प्रक्रिया, फसवणुकीतील पैसे परत मिळविण्यासाठी करावयाची कार्यवाही तसेच या पोर्टलच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना मिळणारी मदत याबाबत त्यांनी सोप्या भाषेत माहिती दिली.

 विद्यार्थ्यांमध्येही सायबर सुरक्षेबाबत जागृती :-

दरम्यान, चामोर्शी पोलीस स्टेशनच्या वतीने सकाळी जे. के. बोमनवार हायस्कूल येथे विशेष सायबर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी भावेश वरगंटीवार, मेजर पौर्णिमा चांदे आणि उपनिरीक्षक ललिता सातव यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे स्वरूप, त्यापासून बचाव करण्याचे उपाय आणि इंटरनेटचा सुरक्षित वापर याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने किंवा अनोळखी APK फाईल डाउनलोड केल्याने होणारे आर्थिक नुकसान, म्युल अकाउंटचा (Mule Account) गैरवापर, ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे उपाय तसेच GRM/MRM पोर्टलचा प्रभावी वापर याबाबत माहिती देण्यात आली. याशिवाय, हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल ब्लॉक करण्यासाठी आणि त्याचा शोध घेण्याच्या प्रक्रियेत CEIR पोर्टलचा वापर कसा करावा, याबाबतही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

 फसवणूक झाल्यास तातडीने तक्रार करा :-

ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा अधिकृत सायबर तक्रार यंत्रणेचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले. फसवणुकीची माहिती तातडीने दिल्यास संबंधित व्यवहारावर वेळीच कार्यवाही होण्याची आणि रक्कम रोखली जाण्याची शक्यता वाढते. मात्र, रक्कम परत मिळणे हे संबंधित प्रकरणातील परिस्थिती व तपासावर अवलंबून असते.

सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना वेगवेगळ्या आमिषांचे संदेश, बनावट लिंक, बनावट ॲप्स आणि बँक खात्यांचा गैरवापर करून लक्ष्य केले जात आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी आपला ओटीपी, एटीएम पिन, सीव्हीव्ही आणि बँक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असेही आवाहन करण्यात आले.

सायबर गुन्ह्यांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, आर्थिक फसवणुकीला वेळीच आळा घालणे आणि विद्यार्थ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सुरक्षित डिजिटल व्यवहारांचा संदेश पोहोचविण्याच्या दृष्टीने चामोर्शी पोलिसांचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular