VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,
१२ ऑक्टोबरपर्यंत २४ तास वीजपुरवठ्याची मागणी पूर्ण करा; अतुल गण्यारपवार यांचा प्रशासनाला अल्टिमेटम,
गडचिरोली /चामोर्शी, 11 ऑक्टोबर 2026::-गडचिरोली जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी सिंचनाची नितांत गरज असताना अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आता शेतकरी आक्रमक झाले असून, १२ ऑक्टोबरपर्यंत वीजपुरवठ्याबाबत मागणी पूर्ण न झाल्यास १३ ऑक्टोबर रोजी चामोर्शीत चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अतुल गण्यारपवार यांनी दिला आहे.
८ ऑक्टोबर रोजी चामोर्शी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकऱ्यांच्या वीज समस्येवर आवाज उठविला. पावसाअभावी धानपिकांना पाण्याची गरज वाढली असताना वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सिंचनाची कामे प्रभावित होत आहेत. परिणामी, मेहनतीने उभे केलेले पीक हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेती धोक्यात :-
गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. सध्याच्या परिस्थितीत पिकांना वेळेवर पाणी देणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, वीजपुरवठा नियमित होत नसल्याने शेतकऱ्यांना सिंचन करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज कधी येईल आणि कधी खंडित होईल, याची निश्चितता नसल्याने शेतीची कामेही विस्कळीत होत आहेत.
शेतकऱ्यांना शेतीसाठी नियमित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, तसेच शेती आणि गावांसाठी स्वतंत्र फीडर बसविण्याचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
१२ ऑक्टोबरची मुदत; अन्यथा रस्त्यावर उतरणार :-
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने १२ ऑक्टोबरपर्यंत मागणीची पूर्तता करावी. अन्यथा १३ ऑक्टोबर रोजी चामोर्शी येथे चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असे अतुल गण्यारपवार यांनी स्पष्ट केले. या आंदोलनामुळे प्रशासनासमोर शेतकऱ्यांच्या वीज समस्येचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
अनेक गावांतील शेतकरी त्रस्त :-
गणपूर, जयरामपूर, येणापूर, दुर्गापूर, लक्ष्मणपूर, मुधोली, विठ्ठलपूर, बामणी देव, सेलूर, हलदीचक, हेटीमाल, भेंडाळा, घोट, आमगाव, आष्टी आणि कुनघाडा परिसरातील शेतकऱ्यांना अनियमित वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
यावेळी मनोज सत्तिक, माधव पाटील, प्रसादे, सुरेश परसोडे, सुधाकर गदे, सुरेश दुमने, बापूजी देशमुख, दीपक दुमने, बसंत बुरुमवार आणि सुनील बकाळे यांच्यासह इतर उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे पीक वाचविण्यासाठी वेळेवर वीजपुरवठा करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. आता प्रशासन या इशाऱ्याला काय प्रतिसाद देते, याकडे चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
