Saturday, October 17, 2026
HomeAheriजोगनगुडा शाळेत शिक्षकांचा तुटवडा! ४० विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भार एकाच शिक्षकावर; अजयभाऊ कंकडालवारांची...

जोगनगुडा शाळेत शिक्षकांचा तुटवडा! ४० विद्यार्थ्यांचा शैक्षणिक भार एकाच शिक्षकावर; अजयभाऊ कंकडालवारांची तातडीने शिक्षक नियुक्तीची मागणी…

VAINGANGA NEWS 24/ विशेष प्रतिनिधी,

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी प्रशासनाला निवेदन; जोगनगुडा शाळेला अतिरिक्त शिक्षक देण्याची मागणी,

गडचिरोली /अहेरी, 17 ऑक्टोबर 2026::- गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अहेरी तालुक्यातील जोगनगुडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची बाब समोर आली आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या तब्बल ४० विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी अपुऱ्या शिक्षकांवर येत असल्याने शाळेला तातडीने अतिरिक्त शिक्षक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनी केली आहे.

४० विद्यार्थी, पण शिक्षकांची कमतरता! शिक्षणाचे नुकसान कोण भरून काढणार :-

जोगनगुडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केंद्र उमानूर, तालुका अहेरी येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग भरतात. या शाळेची एकूण पटसंख्या ४० आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत शिक्षकांची उपलब्धता अपुरी असल्याने अध्यापन करताना अडचणी निर्माण होत आहेत. एकाच शिक्षकाला अनेक वर्ग सांभाळावे लागत असल्यामुळे प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना विषयानुसार पुरेसा वेळ आणि योग्य मार्गदर्शन मिळण्यात अडथळे येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. मात्र, शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असेल, तर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

ग्रामस्थांचे निवेदन; तातडीने शिक्षक देण्याची मागणी :-

या समस्येच्या पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामस्थांनी पंचायत समिती अहेरी येथील गट साधन केंद्रांतर्गत गट शिक्षणाधिकाऱ्यांना अर्ज सादर केला. जोगनगुडा शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने एक अतिरिक्त शिक्षक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

डॉ. अजयभाऊ कंकडालवार यांनीही या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देण्याची मागणी केली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षकांअभावी शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी संबंधित विभागाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

प्रशासनाच्या निर्णयाकडे ग्रामस्थांचे लक्ष :-

शाळेतील शिक्षकांची कमतरता दूर झाल्यास विद्यार्थ्यांना नियमित व प्रभावी अध्यापनाचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे संबंधित शिक्षण विभागाने परिस्थितीची पाहणी करून जोगनगुडा शाळेला अतिरिक्त शिक्षक उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

आता जोगनगुडा शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी शिक्षण विभाग किती तत्परतेने पावले उचलतो आणि शिक्षक नियुक्तीबाबत काय निर्णय घेतो, याकडे पालक व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

यावेळी गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजय नैताम, माजी उपसरपंच मरपल्ली कार्तिक तोगम, अहेरी नगरपंचायतीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, आनंदराव भीमा तळांडी, सुजंगराव तुम्मा जनगम, बका अंकू कुमरे, राजीराव मल्ला करपेत, बापू हच्चा गांधारा, शंकर मल्ला बोरकुट, बापू येय्या गांधारा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Most Popular